काव्य कोकीळ सोपानदेव चौधरी 1
“शब्द गेले सुकोनिया । झाला त्यांचा सुकामेवा
चघळीत बैसतो मी। तोच वाटे मला ठेवा ।।
तुझेच यश माऊली ।
तुलाच मी अर्पितो ।।” 2
सोपानदेव चौधरी 3
कवयित्री बहिणाबाई चौधरींच्या काव्यविशेषांगाचा प्रभाव त्यांचे सुपुत्र सोपानदेव चौधरींवर पडणे स्वाभाविकच होते4. आईचा काव्यभाव आणि ग्रामीण जीवनाचे सूक्ष्म अवलोकन यातून सोपानदेवांच्या कविमनाची जडणघडण होणे हेही स्वाभाविक आहे5. त्यांचा जन्म १६ ऑक्टोबर १९०७ रोजी असोदे या गावी झाला6.
शिक्षण आणि राष्ट्रीय विचार
त्यांचे प्राथमिक शिक्षण असोदे येथील सरकारी शाळेत झाले, तर माध्यमिक शिक्षण राष्ट्रीय टिळक विद्यालय, जळगाव येथे झाले7. स्वातंत्र्य आंदोलनात त्यांनी सरकारी शाळा सोडून जळगावच्या राष्ट्रीय विद्यालयात प्रवेश केल्यावर राष्ट्रीय विचारसरणीचे बीजारोपण होणे क्रमप्राप्तच होते8. विनोबा भावे आणि साने गुरुजींच्या विचारांचा ठसा मनावर उमटल्याने त्यांनी देशभक्तीपर गीते लिहिली9. याच काळात त्यांनी “पुण्यश्लोक महात्मा” आणि “प्रतापी प्रतापसिंह” हे पोवाडे रचले10.
साहित्य क्षेत्रातील योगदान
विविध विषयांमध्ये रस घेणाऱ्या सोपानदेवांनी ग्राम गीते, जानपद गीते, प्रेम कविता, देशभक्तीपर गीते, महाराष्ट्र गीते, ओव्या, अभंग व विडंबनपर कविता लिहून मराठी काव्यसृष्टीत बरीच भर घातली11. जानपद जीवनाचे चित्र रेखाटताना त्यांनी जळगावी रूढ असलेल्या खानदेशी, लेवाबोली या संमिश्र बोलीभाषेचा सहज उपयोग केला12. या माय-लेकांनी (बहिणाबाई आणि सोपानदेव) मराठीच्या दरबारात या संमिश्र बोलीभाषेला मानाचे स्थान मिळवून दिले13.
त्यांनी जानपद जीवनाचे अंतरंग जसे रंगविले, तसेच बहिणामायच्या ममतेचे वर्णनही केले14. त्यांची ग्राम गीते विलक्षण बोलकी आहेत15. त्यांची प्रेम कविता शहरी चाळ्यांवर लुब्ध नसून जानपद जीवन गोंजारणारी आहे16. खरे तर त्यांच्या प्रेम कवितेने या काव्य प्रकाराचा एक आदर्श घालून ठेवला17. सोपानदेवांचे “जय जय महाराष्ट्र” हे महाराष्ट्र गीत अनेकपरींनी सुंदर आहे18.
सोपानदेवांना स्वातंत्र्य, पवित्रता व मांगल्याचे उपासक मानावे लागेल19. ते नव्याचा उपहास करतात, तरी त्याला विरोध करीत नाहीत20. नव-कविता, नव-कथा, नव-चित्रकला तसेच मानवी मनातील वैगुण्यांवर त्यांनी बऱ्याच विडंबनपर कविता रचल्या21. त्यांना विडंबनाचा सोस असल्याने त्यांनी मराठी कवितेत प्रथमच विनोद आणला22. वास्तववादाच्या नावाखाली निर्माण झालेल्या नव-कवितेवर सोपानदेवांसारखे घणाघात क्वचितच कोणी केलेले आढळतील; त्यांचे मित्र मर्देकरही त्यातून सुटले नाहीत23. संतांच्या अभंगातील कल्पना सोपानदेव आपल्या भक्तीपर गीतांमध्ये सहज वापरतात24.
काव्यसंग्रह
त्यांचा सोपानदेवी (१९६०) हा कविता संग्रह विशेष गाजलेला आहे25. त्यांचे काव्य केतकी (१९३२), अनुपमा (१९५०), छंद लिलावती (१९८२), संगीत आणि अमृतगीते (१९९२) इ. संग्रह प्रकाशित झालेले आहेत26.
बहिणाबाईंच्या कार्याला प्रसिद्धी
मराठी काव्यावर सोपानदेवांचे सर्वात मोठे उपकार म्हणजे त्यांनी बहिणाबाई चौधरींचे काव्य महाराष्ट्राच्या निदर्शनास आणले27.
काव्यगायन शैली आणि सन्मान
सोपानदेव बृहन्महाराष्ट्रात अधिक लोकप्रिय झाले ते त्यांच्या काव्यगायन शैलीमुळे28.
- त्यांनी १९२९ साली पुण्याला ना. के. बेहरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पहिल्या कविसंमेलनाला प्रथम जाहीरपणे काव्यगायन केले आणि ते एका रात्रीत कवी म्हणून प्रसिद्धीला आले29. यावेळी त्यांनी गायलेल्या “गोकुळीचा कान्हा कोणी पाहिला कि काय ग!” या कवितेने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले30.१९३२ साली कोल्हापूरला झालेल्या महाराष्ट्र साहित्य संमेलनात त्यांनी रंजक काव्यगायन करून सर्वांचे लक्ष वेधले31. या संमेलनातील कवींच्या कवितेवर व्ही. शांताराम यांनी लघुपट तयार करून तो महाराष्ट्रात ‘सिंहगड’ या चित्रपटाबरोबर सर्वत्र दाखविला गेला, ज्यामुळे त्यांना सर्वत्र प्रसिद्धी मिळाली32.
१९३४ साली बडोदा येथे साहित्य संमेलनात खास निमंत्रित सोपानदेवांनी केलेल्या काव्यगायनावर खूष होऊन राजकवी चंद्रशेखर यांनी त्यांना उत्स्फूर्तपणे “महाराष्ट्र काव्य कोकीळ” हा सन्माननीय किताब बहाल केला33. तसेच, सर्वोत्कृष्ट कवितेचे मानचिन्ह म्हणून त्यावर्षीचे सुवर्ण पदकही त्यांना देण्यात आले34.
त्यांचा मधुर, पल्लेदार आवाज आणि शास्त्रीय संगीताची जाण यामुळे त्यांच्या काव्यगायनात विशेष आनंद भरत असे35. त्यांनी शास्त्रीय संगीताचे शिक्षण पंडित विष्णू दिगंबर गोवर्धन पलुस्कर संगीत महाविद्यालय, मुंबई येथे घेतले होते36. सोपानदेवांचे सुमधुर काव्यगायन म्हणजे सर्वांनाच हवीहवीशी वाटणारी पर्वणी असे; याच माध्यमातून त्यांच्या कविता रसिकांपर्यंत पोहोचल्या आणि त्यांना दाद मिळत गेली37. अनेक वर्षे सोपानदेवांशिवाय कुठलेही कविसंमेलन रंगत नसे इतके ते कवितागायनाच्या परंपरेचे वारसदार ठरले होते38. १९३० ते १९६० अशी तीन दशके त्यांनी आपल्या गेय कवितांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले होते39.
इतर कार्य
- त्यांच्या कवितांचे ध्वनिमुद्रण १९३३ साली कोलंबीया ग्रामोफोन कंपनीने केले होते40.१९४८ साली प्रदर्शित झालेल्या आचार्य अत्रे यांच्या “मोरूची मावशी” या चित्रपटाला सोपानदेवांनी सहाय्यक संगीत दिग्दर्शक म्हणून संगीत व चाली दिल्या होत्या41
- सुप्रसिद्ध साहित्यिक श्री. म. माटे एकदा म्हणाले होते, “सोपानदेवांच्या कविता वाचतांना आणि ऐकताना तुळशीच्या वनातून मंजिऱ्यांचा वास घेत जात आहोत असे वाटतं.” 42
- सोपानदेव हे उत्तम वक्ते होते, त्यांचा ज्ञानेश्वरीचा गाढा अभ्यास होता43. त्यांची पाठांतर शक्ती चकित करणारी होती44.
बहिणाबाई आणि सोपानदेव हे अनुक्रमे सरस्वतीकन्या व पुत्र होते45. मायलेक काव्य लेखन करतात आणि गातात अशी साहित्यात दुसरी जोडी नाही46. बहिणाबाई यांना निसर्गकन्या तर सोपानदेव चौधरी यांना सगळे प्रेमाने व आदराने अप्पा म्हणत असत47. ते संगीत शिक्षक आणि चित्रकला शिक्षक म्हणून सर्व विद्यार्थ्यांना प्रिय होते48.
स्वभाव आणि जीवनतत्व
ते बाणेदार स्वभावाचे होते49. “सुचल्याशिवाय लिहायचं नाही आणि मागितल्याशिवाय द्यायचं नाही” असं त्यांचं जीवनतत्व होतं 50, त्यामुळेच त्यांना भाषाप्रभू असेही म्हटले जायचे51. शिरिष पै (आचार्य अत्र्यांच्या कन्या) यांच्या विवाहप्रसंगी त्यांनीच मंगलाष्टके लिहिली होती52. त्यांचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे ते कोट्याधिश होते, शब्दाशब्दागणिक ते कोट्या करीत असत53. सर्वांना खळाळून हसत आणि हसवत असत54. एकदा रिक्षेत बसल्यानंतर रिक्षावाल्याला म्हणाले, “रिक्षात बसलो आहे पण अंतरिक्षात नेऊ नकोस.” 55
अखेरचे दिवस आणि निधन
शेवटी, वृध्दापकाळाने आणि गळ्यातील कॅन्सर या आजाराने खचलेल्या अवस्थेत सोपानदेवांना बऱ्याच गोष्टी कराव्याशा वाटत होत्या, हे सांगतांना ते सहज म्हणतात, “वृध्दापकाळाने पाय काम करीत नाहीत त्यामुळे माझा निरूपाय आहे.” 56 शेवटी त्यांच्या आरोग्याची विचारपूस करणाऱ्यांना ते काव्यातूनच सांगत असत –
“आम्ही अगदी खुशाल आहोत, ओढित गतस्मरणाची माळ ।
समाधान हे अमुचे लेणे, काय उणे हो आम्हाला ।।
आयुष्याची संध्याकाळ, समाधान हे अमुचे लेणे, काय उणे हो आम्हाला।
ऐलतिरा वरूनी पहात आहे, पैलतिराच्या ब्रह्माला ।।” 57
४ ऑक्टोबर १९८२ रोजी त्यांचे मुंबई येथे निधन झाले58.
बहिणाईंच्या शब्दात, “आला सास,
गेला सास, जीवा तुह्य रे तंतर, अरे जगनं मरनं एका सासाचं अंतर.” 59
अशोक नि. चौधरी
समन्वयक, बहिणाबाई चौधरी ट्रस्ट, जळगाव 60

