खानदेशातील रेल्वे मालधक्का माथाडी कामगारांच्या न्यायासाठी १७ ऑगस्टपासून आमरण उपोषण
कामगार आयुक्त कार्यालयासमोर सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार विशाल सुरवाडे यांचा आंदोलनाचा इशारा
जळगाव | प्रतिनिधी
खानदेशातील रेल्वे मालधक्क्यांवर काम करणाऱ्या हमाल व माथाडी कामगारांच्या विविध प्रश्नांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार विशाल सुरवाडे यांनी १७ ऑगस्ट २०२६ रोजी जळगाव येथील कामगार आयुक्त कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
माथाडी कामगारांच्या कष्टाच्या मोबदल्याबाबत तसेच त्यांच्या हक्कांच्या प्रश्नांबाबत संबंधित यंत्रणेकडून योग्य ती कार्यवाही होत नसल्याचा आरोप सुरवाडे यांनी केला आहे. कामगारांच्या मेहनतीचा पैसा आणि त्यांच्या हक्कांवर गदा आणणाऱ्या व्यवस्थेविरोधात हा लढा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
“खानदेशातील रेल्वे मालधक्का माथाडी कामगारांना जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहील,” असा निर्धार विशाल सुरवाडे यांनी व्यक्त केला आहे.
आमरण उपोषणादरम्यान सुरवाडे यांच्या प्रकृतीला काही धोका निर्माण झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित कामगार आयुक्त व प्रशासनाची राहील, असा इशाराही आंदोलनाच्या आयोजकांकडून देण्यात आला आहे.
माथाडी कामगारांच्या न्यायासाठी होणाऱ्या या आंदोलनाला विविध सामाजिक संघटना, कार्यकर्ते आणि नागरिकांनी पाठिंबा देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. “कामगारांच्या हक्कासाठी एकजुटीने उभे राहूया,” असे आवाहनही करण्यात आले आहे.
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
