
“तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणून आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणे तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ देणे बाबत प्रशासनाचे कर्तव्य” : जिल्हाधिकारी श्री. रोहन घुगे
जळगाव: महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, सहायक आयुक्त, समाजकल्याण कार्यालय, जळगाव आणि ‘तृतीयपंथीयांसाठी स्वयंरोजगार व व्यवसायासाठी बीज भांडवल योजना जिल्हास्तरीय समिती, जळगाव’ यांच्या संयुक्त विद्यमाने तृतीयपंथीय व्यक्तींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी एकदिवशीय जिल्हास्तरीय मार्गदर्शन शिबिर उत्साहात पार पडले.
मान्यवरांचे मार्गदर्शन व प्रमुख उपस्थिती या शिबिराचे प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले मा. श्री. रोहन घुगे (भा.प्र.से.), जिल्हाधिकारी, जळगाव यांनी आपल्या मनोगतात स्पष्ट केले की, “तृतीयपंथीयांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी शासकीय योजनांचा लाभ देणे हे प्रशासनाचे कर्तव्य असून, याद्वारे त्यांच्या हक्काचा विकासाचा मार्ग सुकर होईल.”
या शिबिराला संजय गांधी निराधार योजनेच्या तहसीलदार प्राजक्ता व्यंकटेश केदार, सेन्ट्रल बँकेचे वरिष्ठ प्रबंधक भारत जाधव, निवडणूक शाखेचे तहसीलदार रणजीत कुमावत, पुरवठा निरीक्षक दिपाली राजपूत, आणि सहायक आरोग्य अधिकारी डॉ. रमेश थापते यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. याशिवाय पाचोरा येथील सीमा जान गुरू, फैजपूर येथील शामिभा पाटील (सहअध्यक्ष, विभागीय तृतीयपंथी कल्याण मंडळ), भुसावळचे चांद सरवर तडवी, धरणगावच्या नैना भगवान पाटील, चाळीसगावच्या फिजा गुरू आणि जळगावच्या अंजली व संजना जान गुरू यांनी विशेष उपस्थिती दर्शवली. गोदावरी संस्थेचे विश्वनाथ पाटील व प्लान इंडियाचे अल्केश वाघरे यांच्यासह मोठ्या संख्येने तृतीयपंथीय बांधव या मोहिमेत सहभागी झाले होते.
शासकीय योजनांचे थेट मार्गदर्शन व सेवा शिबिरात विविध विभागांनी एकाच छताखाली खालील विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले:
• तहसील कार्यालय: ओळखपत्रे, रेशन कार्ड, विविध दाखले आणि संजय गांधी निराधार योजनेच्या लाभांची माहिती.
• जिल्हा उद्योग केंद्र (DIC): स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी शासनाच्या योजना व ‘उद्योग आधार’ (Udyam Registration) नोंदणीची प्रक्रिया.
• बँका व आर्थिक महामंडळे: सुलभ पद्धतीने कर्ज पुरवठा, बीज भांडवल योजना आणि सबसिडी (अनुदान) प्रक्रियेची माहिती.
• आयुष्यमान भारत योजना: सदर शिबिरात उपस्थित तृतीयपंथीय व्यक्तींना आरोग्य योजनांची माहिती देऊन त्यांचे ‘आयुष्यमान भारत कार्ड’ काढून देण्यात आले.
स्वयंरोजगारावर विशेष भर समाजकल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘बीज भांडवल योजने’चा जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. तृतीयपंथीयांनी केवळ नोकरीवर अवलंबून न राहता स्वतःचे उद्योग सुरू करून उद्योजक बनण्याचे आवाहन श्री. योगेश पाटील सहायक आयुक्त, समाजकल्याण यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री. हर्षल पाटील यांनी सूत्रसंचालन केले, तर समाजकल्याण विभागाचे विशेष अधिकारी श्री. अमोल कुलकर्णी यांनी आभार मानले. शिबिराच्या यशस्वितेसाठी समाजकल्याण विभागाचे अरुण वाणी, चेतन चौधरी, महेंद्र पाटील, अनिल पगारे, शिला अडकमोल तसेच बार्टीचे प्रकल्प अधिकारी अर्जुन गायकवाड आणि सर्व समतादूतांनी विशेष परिश्रम घेतले.
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
