मुंबई, प्रतिनिधी :
महाराष्ट्र राज्य प्रशासन अधिक लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक करण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या ‘१५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात’ जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाने संपूर्ण राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल जळगाव जिल्ह्याचा राज्यस्तरावर गौरव करण्यात आला.
मुंबई येथील ‘सह्याद्री’ अतिथीगृहात आयोजित विशेष सोहळ्यात राज्याचे मा. मुख्यमंत्री यांच्या हस्ते जळगावचे जिल्हाधिकारी श्री. रोहन घुगे यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
भारतीय गुणवत्ता परिषद (QCI) मार्फत करण्यात आलेल्या निकोप व सर्वंकष मूल्यमापनात जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाने २०० पैकी तब्बल १८८ गुण मिळवून ही कामगिरी साध्य केली आहे. प्रशासनात आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून नागरिकांसाठी Ease of Living आणि शासकीय कर्मचाऱ्यांसाठी Ease of Working साध्य करण्यावर विशेष भर देण्यात आला.
जिल्हा प्रशासनाने खालील सात प्रमुख निकषांवर प्रभावी कामगिरी केली आहे :
- अद्ययावत व नागरिकांसाठी सुलभ संकेतस्थळ (वेबसाईट)
- ‘आपले सरकार’ प्रणालीची प्रभावी अंमलबजावणी
- ई-ऑफीस (e-Office) प्रणालीचा १०० टक्के वापर
- कामकाजाच्या देखरेखीसाठी प्रगत डॅशबोर्ड प्रणाली
- नागरिकांसाठी व्हॉट्सॲप चॅटबॉट सेवा
- कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा नाविन्यपूर्ण वापर
- भौगोलिक माहिती प्रणाली (GIS) चा प्रभावी उपयोग
या सर्व निकषांवर आधारित कामगिरीचे सविस्तर सादरीकरण जिल्हाधिकारी श्री. रोहन घुगे यांनी कार्यक्रमात केले.
यावेळी बोलताना श्री. घुगे म्हणाले, “हे यश जळगाव जिल्हा प्रशासनातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांच्या एकत्रित प्रयत्नांचे फलित आहे. हे यश आम्ही जळगावकर नागरिकांना समर्पित करतो.”
डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून जळगाव जिल्ह्याने प्रशासनात नवा आदर्श निर्माण केला असून, ही कामगिरी जिल्ह्याला विकासाच्या नव्या उंचीवर नेणारी ठरणार आहे.
