धक्काबुक्कीनंतर ग्रामसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू
पारोळा तालुक्यातील शिवरे दिगर येथील घटना; सहा जणांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा
जळगाव | प्रतिनिधी
पारोळा तालुक्यातील शिवरे दिगर येथे ग्रामसभेदरम्यान ग्रामसेवकाला काही ग्रामस्थांनी जाब विचारत धक्काबुक्की केल्याने ते अस्वस्थ झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पारोळा पोलिसांनी सहा जणांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.
प्रल्हाद पाटील (वय ५२) हे शिवरे दिगर येथील ग्रामसेवक होते. सोमवारी गावात ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. जुन्या कामांच्या देयकांवरून ग्रामसेवक पाटील आणि ग्रामस्थांमध्ये वाद झाला. यावेळी सहा जणांनी पाटील यांच्याशी हुज्जत घालत त्यांना शिवीगाळ तसेच मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकारानंतर पाटील यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला.
याप्रकरणी पाटील यांचे भाऊ सुनील पाटील यांच्या तक्रारीवरून श्याम पाटील, ज्ञानेश्वर पाटील, राहुल पाटील, गौरव पाटील, ज्ञानेश्वर पाटील आणि भूषण सरदार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित ज्ञानेश्वर पाटील याला पोलिसांनी अटक केली असून, उर्वरित संशयितांचा शोध सुरू आहे.
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
