धुळे | प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघामार्फत आदिवासी विकास कर्मचारी संघटनेची नाशिक विभागातील प्रकल्पस्तरीय कार्यकारणी जाहीर करण्यात आली. १८ ऑगस्ट २०२६ रोजी धुळे येथे केंद्रीय अध्यक्ष अरुण गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि केंद्रीय अतिरिक्त महासचिव सुशील तायडे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला.
नाशिक विभागातील एकूण सात प्रकल्प क्षेत्रांपैकी तळोदा, नंदुरबार, यावल, धुळे आणि राजूर या पाच प्रकल्प क्षेत्रांमध्ये सर्वानुमते प्रकल्पस्तरीय कार्यकारणीची निवड करण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक, गृहपाल, अधीक्षक, शिक्षक तसेच आदिवासी विकास विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे देण्यात आली.
बैठकीत आदिवासी विकास विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रकल्पस्तरावर भेडसावणाऱ्या विविध समस्यांचा आढावा घेण्यात आला. या समस्या शासन दरबारी मांडून त्यावर योग्य त्या उपाययोजना करण्यासाठी संघटनेमार्फत प्रयत्न करण्यात येतील, असे यावेळी सांगण्यात आले.
प्रकल्पस्तरीय कार्यकारणी निश्चित करून पदाधिकारी व सदस्यांना त्यांच्या कामकाजाची जबाबदारी सोपविण्यात आली. तसेच संघटित राहण्याचे महत्त्व अधोरेखित करताना, कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या प्रश्नांसाठी एकजुटीने काम केल्यास योग्य निर्णय व प्रभावी कार्यवाही करता येते, असे विविध पदाधिकाऱ्यांनी विचार व्यक्त केले.
नाशिक विभागातील स्थानिक स्तरावरील समस्यांचा नियमित आढावा घेऊन आवश्यकतेनुसार संबंधित विभागाशी पत्रव्यवहार करावा. तसेच महत्त्वाच्या समस्या वरिष्ठ पातळीवर महासंघाच्या निदर्शनास आणून द्याव्यात, असे निर्देशही देण्यात आले.
नवीन कार्यकारणीच्या माध्यमातून आदिवासी विकास विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडून त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी संघटितपणे पाठपुरावा करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
