मुंबई, दि. ५ ऑगस्ट : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मुंबई येथे ‘देवेंद्र ते देवाभाऊ’ या बहुचर्चित पुस्तकाच्या मुखपृष्ठाचे अनावरण करण्यात आले. अजित चव्हाण आणि कपिल हांडे लिखित हे पुस्तक विहान प्रकाशन तर्फे प्रकाशित होत असून, सुमारे ३५० पानांचे हे पुस्तक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जीवनप्रवास, नेतृत्व आणि विकासदृष्टीचा सखोल वेध घेणारे संदर्भग्रंथ ठरणार आहे.
लेखकांनी सांगितले की, गुरुपौर्णिमेच्या दिवशी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते मुखपृष्ठाचे अनावरण करण्याचा मानस होता. मात्र विविध कारणांमुळे तो योग आज जुळून आला. पुस्तकाचे लेखन अत्यंत अभ्यासपूर्ण, वस्तुनिष्ठ आणि मनापासून करण्यात आले असून, प्रत्येक घटनेचा अभ्यास करून त्याचे दस्तऐवजीकरण करण्यात आले आहे.
हे पुस्तक केवळ एका राजकीय नेत्याचे चरित्र नसून, एका सामान्य कार्यकर्त्यापासून महाराष्ट्राच्या नेतृत्वापर्यंत झालेल्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या बालपणातील संस्कार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील वैचारिक जडणघडण, विद्यार्थी चळवळीतून उभे राहिलेले नेतृत्व, भारतीय जनता पक्षातील राजकीय वाटचाल, आमदार, विरोधी पक्षनेते आणि मुख्यमंत्री म्हणून केलेले कार्य यांचा सविस्तर आढावा या पुस्तकात घेण्यात आला आहे.
राज्याच्या विकासात महत्त्वपूर्ण ठरलेल्या अनेक विषयांवर स्वतंत्र अध्यायांचा समावेश करण्यात आला आहे. डिजिटल महाराष्ट्र, उद्योग व गुंतवणूक, कृषी सुधारणा, मुंबई मेट्रो प्रकल्प, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग, वढवण बंदर, मराठा समाज, महिला सक्षमीकरण, नक्षलमुक्त महाराष्ट्र आणि कुंभमेळा २०२७ यांसारख्या विषयांचे विश्लेषण पुस्तकात करण्यात आले आहे. तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयक्षमता, प्रभावी वक्तृत्व, संघटन कौशल्य, दूरदृष्टी आणि नेतृत्वशैलीचा अभ्यासही यात मांडण्यात आला आहे.
या पुस्तकाचे विशेष आकर्षण म्हणजे प्रत्येक अध्यायाच्या शेवटी दिलेला ‘जीवनबोध’ हा विभाग. विद्यार्थी, स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे युवक, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, प्रशासकीय अधिकारी तसेच सर्वसामान्य वाचक यांना प्रेरणा देणारे विचार, मूल्ये आणि कृतीशील संदेश या विभागातून देण्यात आले आहेत. त्यामुळे हे पुस्तक माहितीपर असण्याबरोबरच व्यक्तिमत्त्व विकास, नेतृत्वनिर्मिती, राष्ट्रसेवा, लोकाभिमुख प्रशासन आणि सकारात्मक सामाजिक परिवर्तनासाठी मार्गदर्शक ठरणार असल्याचा विश्वास लेखकांनी व्यक्त केला.
‘देवेंद्र ते देवाभाऊ’ हे पुस्तक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सार्वजनिक जीवनातील कार्य, नेतृत्व आणि विकासदृष्टीचे बहुआयामी दर्शन घडवणारा प्रेरणादायी दस्तऐवज ठरणार असून, महाराष्ट्राच्या समकालीन राजकीय आणि विकासात्मक प्रवासाचा अभ्यास करू इच्छिणाऱ्या प्रत्येक वाचकासाठी ते उपयुक्त संदर्भग्रंथ ठरेल. या पुस्तकाचा भव्य प्रकाशन सोहळा लवकरच आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
