चोपडा (प्रतिनिधी) – महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक जनाबाई रामाजी उईके मंगळवार, दि. ३ मार्च २०२६ रोजी जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्याच्या दौऱ्यावर येत असून पारंपरिक होळी उत्सवात सहभाग घेणार आहेत. तसेच आदिवासी बांधवांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आयोजित ‘आदिवासी विकास परिषदे’चे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे.
मंत्री उईके सकाळी ७.३० वाजता शिरपूर येथून बोऱमळी (ता. चोपडा) येथे प्रस्थान करतील. सकाळी ९ वाजता बोऱमळी येथे आगमनानंतर ते आदिवासी बांधवांच्या पारंपरिक होळी उत्सवात सहभागी होणार आहेत. आदिवासी संस्कृतीचा सन्मान व परंपरांशी नाळ जोडणे हा या सहभागाचा मुख्य उद्देश असल्याचे सांगण्यात आले. 
दुपारी १२.३० वाजता वर्डी (ता. चोपडा) येथे आदिवासी विकास विभागातर्फे भव्य ‘आदिवासी विकास परिषद’ आयोजित करण्यात आली आहे. परिषदेत शासनाच्या विविध जनकल्याणकारी योजनांची माहिती आदिवासी घटकांपर्यंत पोहोचविण्यावर भर दिला जाणार आहे. सकाळी १० वाजल्यापासून विविध विकास कामांचे प्रदर्शन भरविण्यात येणार असून मंत्री उईके यांची त्यास भेट राहील.
परिषदेत मंत्री उईके आदिवासी बांधवांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या, अपेक्षा व विकासविषयक मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत. तसेच शिक्षण, आरोग्य, रस्ते, पिण्याचे पाणी, रोजगार यांसारख्या विषयांवर शासनाच्या योजनांची माहिती देण्यात येणार आहे.
दरम्यान, सकाळी ११.३० वाजता वर्डी येथे श्री समर्थ सुकनाथ बाबा संजीव समाधी मंदिर येथे पूजन कार्यक्रमास मंत्री उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर आदिवासी विकास परिषदेचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे.
या कार्यक्रमास केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे, जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, आदिवासी विकास राज्यमंत्री इंद्रनील नाईक, खासदार स्मिताताई वाघ, आमदार चंद्रकांत सोनवणे, आमदार अमोल जावळे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी व अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
जिल्ह्यातील आदिवासी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन यावल प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांनी केले आहे.
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
