शिधापत्रिकांचे शुद्धीकरण; १० हजार संशयास्पद लाभार्थ्यांची नावे जाणार!
‘मिशन सुधार’ अभियानात आधार क्रमांक व तांत्रिक माहितीच्या आधारे पडताळणी
जळगाव | प्रतिनिधी
शासनाकडून राबविण्यात येत असलेल्या ‘मिशन सुधार’ अभियानाअंतर्गत जिल्ह्यातील शिधापत्रिकांचे शुद्धीकरण करण्यात येत असून, यामध्ये सुमारे १० हजार संशयास्पद लाभार्थ्यांची नावे रद्द होण्याची शक्यता आहे. आधार क्रमांक, ई-केवायसी व इतर तांत्रिक माहितीच्या आधारे सखोल पडताळणी सुरू करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील अनेक शिधापत्रिकांमध्ये अपात्र लाभार्थी, स्थलांतरित व्यक्ती, मृत व्यक्तींची नावे तसेच दुहेरी नोंदी आढळून आल्याने शासनाने ही विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत शिधापत्रिकाधारकांची घरोघरी तपासणी करण्यात येत असून, संबंधित कागदपत्रे व माहितीची खातरजमा केली जात आहे.
आधार क्रमांकाशी शिधापत्रिका संलग्न नसणे, ई-केवायसी अपूर्ण असणे, तसेच वास्तव्यास नसलेल्या लाभार्थ्यांची नावे यामुळे अनेक कार्डे संशयाच्या भोवऱ्यात आली आहेत. पडताळणीनंतर अपात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांची नावे यादीतून वगळण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
तहसीलदार, पुरवठा निरीक्षक व संबंधित कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून ही मोहीम राबविण्यात येत असून, पात्र लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ योग्य पद्धतीने मिळावा, हा या कारवाईचा मुख्य उद्देश आहे. नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
