बाजाराचा दिवस होता. बाजाराचे गाव तालुक्याचे ठिकाण होते त्यामुळे तालुक्याच्या या गावात आजूबाजूच्या खेड्या-पाड्यांतून आलेल्या माणसांची दाट वर्दळ जमा झाली होती. सकाळची कामे उरकून आलेली ती वर्दळ किराणा, भाजीपाला आणि इतर आवश्यक वस्तूंची खरेदी करून परतण्याच्या घाईत होती. बाजाराच्या गावाने अवघ्या परिसरातील खेड्या-पाड्यांतील माणसांना आपल्या उदरात सामावून घेतले होते. बाजारात उत्साह तसेच वस्तूंच्या आणि पैशांच्या देवाणघेवाणीचा एक अखंड नाद वातावरणात भरून राहिला होता.
संध्याकाळची वेळ झाली होती. घड्याळाने सहाचा आकडा कधी पार केला हे कळलेच नाही. सूर्य आता पूर्ण मावळला नव्हता, पण त्याची तीव्रता बरीच कमी झाली होती. बाजाराच्या वर्दळीने कमावलेला शारीरिक थकवा आता प्रत्येक चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. मी एका चहाच्या टपरीवर हातात गरमागरम चहाचा ग्लास घेऊन निवांतपणे समोरच्या जगाचे (बाजाराचे) शांतपणे निरीक्षण करत बसून होतो, माझ्या चहा अर्धा बाकी होता त्यातच माझ्या निरीक्षणात तेव्हा एक लहानशी पण मनाचा ठाव घेणारी घटना घडली, ज्यामुळे मला ‘आनंद’ या शब्दाचा खरा अर्थ उमगला.
बाजार ओसरत चालला होता, लोक थकलेली, तसेच बाजारातील विक्रेतांच्या आवाजाने आणि गोंगाटाने हैराण झालेले दिसत होते. विक्रेत्यांचा आवाजही नरमला होता, जणू सुरुवातीचा बाजारातील असलेला जोश थंडावला होता. त्यात समोरून एक विलक्षण आनंदी कुटुंब येतांना मी पहिले, कदाचित ते त्यांच्या या विशिष्ट क्रियांमुळे लक्षात आले, त्यामध्ये एक तरुण जोडपे आणि त्यांची दोन लहान मुले. तीशीच्या आतले ते जोडपे. त्यांच्या साधेपणातून आणि कपड्यांवरून त्यांची आर्थिक परिस्थिती नाजूक असावी हे लगेच जाणवत होते. तरुणाचा लालसर, वापरून फिकट झालेला शर्ट, तर तरुणीची मळकट पिवळी साडी. मुलांचेही शर्टांचे बटन तुटलेले, मळकट झालेलं पांढरे शर्ट आणि खाकी हाफ पॅन्ट. त्यांच्या सर्वांच्या पायात घासून जीर्ण झालेल्या चपला होत्या, पण त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची आणि उत्साहाची एक निरागस लकाकी होती. एकाच्या हातात एक छोटी (खेळणी) गाडी, तर दुसऱ्याच्या हातात बासरी होती. ते चालतानाही खेळत होते. हे कुटुंब इतके उत्साही दिसत होते जसे विकेंडला लोक पिकनिकला जातात, तसे ते बाजारात पिकनिक ला आलेले वाटत होते. त्यानंतर पुढे तो तरुण दाढी करण्यासाठी एका न्हाव्याच्या दुकानात गेला. इतर लोक आपल्या नंबरची वाट पाहून कंटाळले होते, पण या तरुणाने न्हाव्याने सांगितलेला वेळ शांत आणि संयमपणे स्वीकारला. तो मुलांजवळ बसला आणि त्याची पत्नी बाहेरच्या ओट्यावर. थोड्याच वेळात तो त्याच्या लहान मुलांसोबत खेळू लागला. मध्येच गुदगुल्या करून त्यांना खळखळून हसवत होता. त्याच्या सोबत असणारी त्याची पत्नीचे लक्ष त्यांच्याकडेच होते, काही वेळात त्याचा नंबर आला. तो दाढी करायला खुर्चीवर बसला, त्याचे पूर्ण लक्ष पत्नीकडे होते. आणि तिचेही! तो आरशातून तिला पाहून हसला, जणू काहीतरी विचारत होता. तीही त्याला लाजून निशब्द उत्तर देत होती. दाढी झाल्यावर त्याने आरशातून तिच्याकडे पाहिले. त्या नजरेत एक मौन प्रश्न होता— “मी कसा दिसतोय?” आणि तिने दिलेले उत्तरही शब्दातीत होते. तिनेही त्याचप्रमाणे त्याला इशाऱ्याने, प्रेमळ नजरेने लाजत उत्तर दिले. त्या क्षणी, त्यांच्यासाठी आजूबाजूचे जग, ती गर्दी, ते दुकान विरून गेले होते. त्यांच्या डोळ्यात केवळ एकमेकांबद्दलचा अखंड आदर, निस्वार्थ प्रेम, आणि उत्कट आपुलकी दिसत होती. हे प्रेम ना अटींनी बांधलेले होते, ना कोणत्याही शर्थींनी. हे होते शब्द आणि शरीरापलीकडील, निखळ आणि निस्वार्थ प्रेम.
मी स्तब्ध झालो. माझ्या हातातील चहा थंड झाला होता; तो मी प्यायचेही विसरलो होतो. काही वेळाने तो तरुण मुलांना आईचा हात धरायला सांगून, बायकोच्या हातातील सामान आपल्या हातात घेऊन, निघाला. मी तोपर्यंत त्यांना पाहत राहिलो, जोपर्यंत ते गर्दीत दिसेनासे झाले.
मी घरी आलो, पण मन बेचैन झाले होते. मी सतत विचार करत होतो: हे कुटुंब इतक्या साध्या परिस्थितीतही आनंदाने, समाधानाने आणि सुखाने कसे जगू शकते? त्यांच्याकडे कसलीही तक्रार नाही, कोणतीही निराशा नाही. पत्नीच्या वागण्यातून हे स्पष्ट दिसत होते: “माझे पती हेच माझे विश्व, माझे जीवन, माझा आनंद आहे.” आणि दुसरीकडे, गडगंज संपत्ती असूनही, केवळ छोट्या-छोट्या तक्रारींवरून, शुल्लक गोष्टींवरून वाद करणारे, विभक्त होणारे कितीतरी परिवार माझ्या डोळ्यासमोर उभे राहिले. या घटनेतून मला एक मूलभूत सत्य कळून चुकले: आनंद आणि सुख हे केवळ समाधानाचे फलित आहे. आपण ज्या परिस्थितीत आहोत, जी आर्थिक स्थिती आपल्याला लाभली आहे, तो समाज आणि ते जीवन समाधानाने स्वीकारले पाहिजे. आकर्षण किंवा क्षणभंगुर सौंदर्य कधीतरी संपेल, पैसा सर्वकाही देऊ शकत नाही. ज्याला ‘समाधान’ मिळवायला जमले, त्याचे जीवन आपोआप सुखमय आणि आनंदीमय होऊन जाते. त्या थंड झालेल्या चहाच्या ग्लासाने आणि त्या गरीब कुटुंबाने मला जीवनातील सर्वात महत्त्वाचा धडा शिकवला: खरा आनंद हा बाह्य परिस्थितीत नसतो, तो केवळ आंतरिक समाधानात असतो.
प्रा. निलेश चौधरी
मूळजी जेठा महाविद्यालय (स्वायत्त)
जळगाव
संपर्क: ९४०४३५३७७८
