काव्यरत्नांजली नव्हे ते तर….
जळगाव शहरातील हार्ट ऑफ द सिटी म्हणता येईल असा सर्वांचा एकमेव आवडता चौक म्हणजे
महाबळ रोडवरील केआरसी
“काव्यरत्नावली” चौक .गेल्या आठवड्यात समाज माध्यमावरील बातमीत या चौकाचे नाव चुकून वेगळेच दिसले. काव्य रतनांजली.कुणी काही म्हणत कुणी काही लिहितं पण कोण हे , काय आहे हे, हे शोधत बसायला वेळही नाही. बरं
त्या चौकातही तशी माहिती नाही.असो. तब्बल १३८ वर्षा पूर्वी म्हणजे १८८८ साली महाराष्ट्रात प्रथमच कवितेला वाहिलेले एक मासिक त्या काळातील खान्देश जिल्ह्यात सुरू झाले. ब्रिटिशांच्या काळात फक्त कवितेसाठी असं मासिक सुरू करण्याच धाडस ज्यांनी केलं त्या थोर महापुरुषाचे नाव आहे नानासाहेब नारायण नरसिंह फडणीस. त्यांनी जळगाव येथे १८८० साली पहिला छापखाना खान्देशात सुरू केलेला तो शिळाप्रेस छापखाना होता. याच छापखान्यातून त्यांनी पहिलं मराठी साप्ताहिक सुरू केलं त्याच नाव आहे प्रबोधचंद्रिका आणि ते वर्ष होत सन १८८०. हा छापखाना सुरू असताना त्यांनी पहिलं मासिक सुरू केलं आणि तेही फक्त कवितेसाठी. मराठी साहित्यातील तो कालखंड होता अर्वाचीन कालखंड. केशवसुत, ह.ना.आपटे, भा.रा.तांबे, त्र्यंबक बापुजी ठोंबरे (बालकवी), दु.आ. तिवारी आदींचा. काव्य रत्नावली मासिकाच्या एका अंकाची किंमत होती चार आणे , वार्षिक वर्गणी दीड रुपया. या मासिकाने महाराष्ट्रातील तत्कालीन कवींच्या दोन लाखांहून अधिक कविता छापल्या असून हा त्या काळातील एक विक्रम होता. आधुनिक मराठी कविता याच काळात बहरली. कृष्णाजी केशव दामले यांना “केशवसुत” ही उपाधी नानासाहेब फडणीस यांनीच दिली तर १९०७ साली नानासाहेब फडणीसांनी पहिले कवी संमेलन भरवून त्र्यंबक बापुजी ठोंबरे यांना (बालकवी) ही उपाधी अर्पण केली. एकूणच मराठी कवितेचा धांडोळा घेतला असता नानासाहेबांच्या प्रयत्नामुळेच अर्वाचीन मराठी कवितेला व्यासपीठ मिळवून दिले आहे. केशवसुत, बालकवी, माधव ज्युलियन, बहिणाबाई, बा.सी.मर्ढेकर, गोविंदाग्रज,कवी गिरीश,कवी यशवंत, सोपानदेव चौधरी, आचार्य अत्रे, कवी दत्त यांचे सह शेकडो कवींच्या कविता त्या काळात प्रसिद्ध झाल्या.
जुन्या जळगांव येथील श्रीराम मंदिर परिरातील जगतगुरु व नंतर बाबजी प्रिंटिंग प्रेस हा त्या काळात कौतुकाचा विषय होता. बहिणाबाई चौधरी यांनी त्यांच्या एका कवितेत नानाजीचा छापखाना असे वर्णन केले आहे.
नानासाहेबांना काव्यरत्नावलीकार असे म्हटले जाते. प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती झाल्यानंतर त्यांच्या आगमनाचे वेळी हा चौक सुशोभित झाला. मान्यवर कवींच्या कविता संगमरवरी दगडावर कोरण्यात आल्या आणि चौकाला काव्यरत्नावली असे नाव दिले पण त्या नानासाहेब यांची किंवा त्या मासिकाची माहिती कुठे दिसत नाही. आज हे सांगण्याचे निमित्त असे की १४ ऑक्टोबर १९३७ रोजी नानासाहेब फडणीस यांचे निधन झाले. त्यांच्या ८८व्या स्मृती दिनानिमित्त भावपूर्ण श्रद्धांजली.🙏🙏💐
अनिल पाटील.
पुणे/जळगाव.
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.


काव्यरत्नांजली नव्हे ते तर….