जळगाव – लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आणखी एक मोठी कारवाई करत महिला पोलिस कर्मचाऱ्याला तब्बल ₹७३,००० लाच स्वीकारताना रंगेहात पकडले आहे. ही कारवाई दि. १३ ऑक्टोबर २०२५ रोजी करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, खाजगी पेट, ता. सिल्लोड, जि. औरंगाबाद येथील श्री. शिवलाल रत्नम कोळी यांच्याकडून तक्रार आली होती की, महिला पोलिस कर्मचारी खाजगी तक्रार मागे घेण्यासाठी लाच मागत आहे. संबंधित आरोपीने तक्रारदाराकडून एकूण ₹७३,००० ची मागणी केली होती. तक्रारीची खातरजमा करून लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव यांनी पथक तयार केले. नियोजनानुसार सापळा रचून महिला पोलिस कर्मचाऱ्यास लाच स्वीकारताना जळगाव येथे रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पथकामध्ये पोलीस निरीक्षक दिनेश हिरे, सहायक पोलीस निरीक्षक शिरीष पाटील, तथा कर्मचारी पांडुरंग ठाकूर, प्रफुल पाटील यांनी सहभाग घेतला. तक्रारदाराच्या तक्रारीवरून आरोपी महिला पोलिसाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
