
पाचोरा (प्रतिनिधी)
पाचोरा तालुक्यातील बदरखे गावात गेल्या काही दिवसांपासून गावठी दारूचे खुलेआम उत्पादन आणि विक्री सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. स्थानिक नागरिकांच्या वारंवार तक्रारी असूनही संबंधित प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गावाच्या परिसरालगत असलेल्या संभाजीनगर जिल्हा हद्दीत तांडा भागात दिवसा ढवळ्या दारूचे धंदे बिनधास्तपणे सुरू असतात. या व्यवसायामुळे गावातील युवकांमध्ये व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढले असून काही दिवसांपूर्वी एका युवकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती.
शाळा व मंदिर परिसरातही मद्यपींची वर्दळ वाढल्याने महिला वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामस्थांनी पोलीस पाटील व महसूल अधिकाऱ्यांकडे तक्रारी नोंदवल्या असल्या तरी केवळ आश्वासनांवरच प्रकरण थांबत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
या पार्श्वभूमीवर संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून बदरखे परिसरातील गावठी दारूचा बेकायदा व्यवसाय बंद करावा, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे
