प्रतिनिधी | भडगाव तालुका
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव बुद्रुक येथे व्यवहारज्ञान व गणितीय संकल्पनांची सुस्पष्टता साधण्यासाठी ‘बाल आनंद मेळावा’चे यशस्वी आयोजन करण्यात आले. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी स्वतः विविध अल्पोपहारांचे स्टॉल लावून प्रत्यक्ष व्यवहाराचा अनुभव घेतला.
मेळाव्यात भेळ, पाणीपुरी, हरभरा उसळ, खमंग पदार्थ, पोहे, इडली, गुलाबजाम, सोनपापडी आदींसह इतर आकर्षक स्टॉल विद्यार्थ्यांनी उभारले होते. विद्यार्थ्यांनी पदार्थ तयार करण्यासाठी लागणारा कच्चामाल, त्याची किंमत, नफा-तोटा यांचा हिशोब स्वतः मांडला. त्यामुळे गणितीय क्रिया, अंकज्ञान तसेच बाजारपेठेचा प्राथमिक अभ्यास प्रत्यक्ष कृतीतून साध्य झाला.
या उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये व्यवहारज्ञानाची जाणीव निर्माण करणे, आर्थिक साक्षरता वाढवणे आणि सर्वांगीण शिक्षणाचे ध्येय साध्य करणे हा होता. प्रत्यक्ष विक्री-खरेदी प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास व संवादकौशल्यही वृद्धिंगत झाले.
कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भाऊसो कैलास मोरे व सर्व संचालक मंडळ यांची उपस्थिती लाभली. तसेच कजगाव केंद्राचे केंद्रप्रमुख दादासो कैलास देवरे यांनी विद्यार्थ्यांना व्यवसाय यशस्वीतेच्या आदर्श पायऱ्यांविषयी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापिका श्रीमती साधना कनकसिंग पाटील व उपशिक्षिका श्रीमती स्वाती ह्याळिंगे यांनी विशेष परिश्रम घेतले. या उपक्रमामुळे शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेत भर पडल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
