उत्तर महाराष्ट्रातील नगरपरिषदा व महापालिका निवडणुकांचे निकाल समोर आल्यानंतर शिवसेना (शिंदे गट) यांच्या कामगिरीबाबत पक्षांतर्गत अस्वस्थता वाढल्याचे चित्र आहे. जळगाव जिल्ह्यासह अनेक ठिकाणी भाजपने स्वबळावर प्रभावी कामगिरी केल्याने शिंदे गटाच्या संघटनात्मक ताकदीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. याच पार्श्वभूमीवर पक्ष नेतृत्वाकडून संघटनात्मक फेरबदल आणि मंत्रिमंडळात खांदेपालट करण्याबाबत हालचालींना वेग आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका डोळ्यासमोर ठेवून संपूर्ण जिल्ह्यात पक्षीय पकड मजबूत होण्याच्या दृष्टीने शिंदे गटाकडून नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा विचार सुरू असल्याचे सांगितले जात आहे. पक्षाची स्थानिक पातळीवरील पकड मजबूत करण्यासाठी आणि कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्यासाठी मंत्रिमंडळात
बदल करून काही नव्या आमदारांना जबाबदारी देण्याचा पर्याय नेतृत्वाकडून तपासला जात आहे.
जळगाव जिल्ह्यातील नावांची चर्चा या संभाव्य खांदेपालटीत जळगाव जिल्ह्यातील काही आमदारांची नावे जोरकसपणे पुढे येत आहेत. त्यात विशेषतः पाचोरा मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील यांचे नाव आघाडीवर असल्याची चर्चा आहे. अलीकडील काळात त्यांनी पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली असून, विविध स्थानिक प्रश्नांवर त्यांनी सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केल्याचे दिसून येते. त्यामुळे त्यांना मंत्रीपदाची संधी मिळू शकते, असा अंदाज राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत. जवळपास चाळीस वर्षानंतर के. एम. बापू यांच्या नंतर पाचोरा भडगाव मतदार संघास मंत्रिपदाचा मान मिळणार आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, केवळ मंत्रीपदच नव्हे तर जळगाव जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाबाबतही फेरविचार होण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लक्षात घेता, जिल्ह्याला अधिक वेळ देणारा आणि संघटनात्मक बांधणी करू शकणारा चेहरा पुढे आणण्याचा प्रयत्न शिंदे गटाकडून केला जाऊ शकतो.एकंदरीत, शिंदे गटासाठी जळगाव जिल्हा आगामी निवडणुकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. त्यामुळे येत्या काळात मंत्रिमंडळ विस्तार किंवा फेरबदल झाला, तर जळगावमधून हॅट्रिक केलेले आणि संघटनात्मक दृष्टीने प्रबळ भूमिका ठेऊन असलेले आमदार किशोर आप्पा यांना केव्हा संधी मिळते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. त्यामुळे पक्ष नेतृत्वाचा अंतिम निर्णय काय होतो, हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
