चांदसर आश्रमशाळेच्या खो-खो संघाचे राज्यस्तरीय क्रीडास्पर्धेत घवघवीत यश
चांदसर (ता. धरणगाव | प्रतिनिधी):
महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, चांदसर येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत शाळेचा व परिसराचा नावलौकिक वाढविला आहे. अमरावती येथे पार पडलेल्या या स्पर्धेत चांदसर आश्रमशाळेच्या खो-खो संघाने अंतिम सामन्यात विजय मिळवत अजिंक्यपद पटकावले आहे.
या ऐतिहासिक यशामुळे शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, चांदसर ही धरणगाव तालुक्यातील पहिली आश्रमशाळा ठरली आहे, जिने राज्यस्तरीय क्रीडास्पर्धेत अजिंक्यपद मिळविले आहे. या संघातील सर्व खेळाडू १४ वर्षांखालील गटातील असून त्यांनी संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट सांघिक खेळाचे प्रदर्शन केले.
या यशामागे क्रीडा शिक्षक श्री. विशाल पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या सातत्यपूर्ण सराव, शिस्तबद्ध प्रशिक्षण आणि प्रेरणेमुळे विद्यार्थ्यांनी हे यश संपादन केले, असे शाळा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
या यशाबद्दल प्रकल्प अधिकारी श्री. अरुण पवार, सहाय्यक प्रकल्प अधिकारी श्री. पवनकुमार पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी श्री. शिवराज नायगाव, तसेच श्री. प्रशांत माहरे, श्रीमती मीनाक्षी सुलगाने, श्री. संदीप पाटील, श्री. एस. एम. पाटील, श्री. राजेंद्र मुसळे, श्री. मिलिंद पाईकराव आदी अधिकाऱ्यांनी व शिक्षकांनी खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.
शाळेचे मुख्याध्यापक श्री. डी. एन. देशपांडे, अध्यक्ष श्री. विजय खराटे, तसेच सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या यशामुळे चांदसर परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विद्यार्थ्यांच्या क्रीडाक्षेत्रातील प्रगतीला नवी दिशा मिळाली आहे.
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
