
जळगाव : स्वातंत्र्योत्तर कालखंडात प्रगती आणि आव्हाने यांची सांगड घालताना समाजातील बहुआयामी वास्तव समजून घेण्यासाठी ज्ञानशाखांच्या चौकटीबाहेर जाऊन संशोधन व अभ्यास करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन पुणे येथील प्रा. राजेश्वरी देशपांडे यांनी केले. त्या शुक्रवार दि.९ जानेवारी रोजी मूळजी जेठा महाविद्यालयात आयोजित एकदिवसीय बहुविद्याशाखीय परिषदेत बीजभाषक म्हणून बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. सं. ना. भारंबे हे होते. ज्ञानाचे प्रतीक असलेल्या बोधी वृक्षास मान्यवरांच्या हस्ते पाणी देऊन परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. ही परिषद कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव आणि मूळजी जेठा ‘स्वायत्त’ महाविद्यालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती. प्रधानमंत्री उच्चत्तर शिक्षण अभियान (पीएम-उषा), शिक्षण मंत्रालय, भारत सरकारच्या पीएम-उषा योजनेअंतर्गत, ‘स्वातंत्र्योत्तर भारतातील परिवर्तने : उपलब्धी, आव्हाने आणि पुढील दिशा’ या विषयावरील परिषदेत बोलताना त्या पुढे म्हणाल्या की, आजची ही परिषद आंतरविद्याशाखीय स्वरूपाची असून भारतातील सामाजिक वास्तव बहुआयामी आहे. स्वातंत्र्योत्तर कालखंडात प्रगती आणि आव्हाने यांची सरमिसळ दिसून येते. जगातील समकालीन घडामोडींचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष परिणाम समाजावर दिसतो. मात्र आपला बहुतांश ज्ञानव्यवहार आजही संबंधित ज्ञानशाखांपुरताच मर्यादित राहिला आहे. हा ज्ञानव्यवहार खुला करण्यासाठी खऱ्या अर्थाने आंतरविद्याशाखीय उपक्रम, व्यवहार, संशोधन प्रकल्प व अभ्यासक्रम सुरू केल्यास त्याचा सर्वांना निश्चितच लाभ होऊ शकेल. या वेळी या परिषदेच्या प्रमुख उद्घाटक म्हणून के. सी. ई. सोसायटीच्या शैक्षणिक संचालिका प्रा. मृणालिनी फडणवीस ह्या होत्या. या वेळी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या की, आजचा हा कार्यक्रम आयोजित करताना आम्हाला विशेष आनंद वाटत आहे. एकोणाविसशे सत्तेचाळीसला भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्या दिवसापासून आपला नवा जन्म झाला असून भारताने सामाजिक , आर्थिक आव्हानांना सामोरे जात लोकशाही, औद्योगिकीकरण आणि वैज्ञानिक प्रगतीच्या मार्गाने विकास केला आहे. या परिषदेसाठी प्रमुख अतिथी म्हणून प्रा. साहेबराव भुकन (अधिष्ठाता, आंतरविद्याशाखा, क. ब. चौ. उ. म. वि., जळगाव) हे उपस्थित होते. प्रा. भुकन यावेळी प्रमुख अतिथी म्हणून बोलताना म्हणाले की, एकोणाविसशे सत्तेचाळीसचा भारत आणि आजचा भारत यामध्ये आमूलाग्र असा बदल झालेला दिसतो. त्या वेळी आठरा टक्के असणारी साक्षरता आज ऐंशी टक्याच्याही पुढे पोहोचलेली आहे. पुढील काळात शिक्षणाच्या माध्यमातून सुसंस्कृत व जबाबदार माणूस घडविणे हीच आपली खरी दिशा असली पाहिजे. या वेळी अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य भारंबे म्हणाले की, स्वातंत्र्योत्तर कालखंडातील विविध आयामांचा परामर्श व पार्श्वभूमी समजून घेणे ही आपली गरज आहे. सर्व स्तरातील बदल समजून घेणे ही आपल्यासाठी संधी असून त्यातूनच नावीन्यता निर्माण होईल. जी समाजासाठी आवश्यक आहे.
या परिषदेस महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ. सुरेखा पालवे, अधिष्ठाता प्रा. भूपेंद्र केसुर, प्रा. भूषण काविमंडन, डॉ. अब्दुलकादिर आरसीवाला इ. मान्यवर उपस्थित होते.
या वेळी या परिषदेत सहभागी अभ्यासकांच्या शोधनिबंध संपादित अंकांचे प्रकाशन करण्यात आले. दुसऱ्या सत्रात डॉ. एलिझाबेथ कानडे (पुणे), तिसऱ्या सत्रात प्रा. भूषण चौधरी (जळगाव) आणि चौथ्या सत्रात प्रा. अनिल डोंगरे (अधिष्ठाता, वाणिज्य व व्यवस्थापन, क. ब. चौ. उ. म. वि., जळगाव) इ. मान्यवरांनी मार्गदर्शन केले. या परिषदेत स्वातंत्र्योत्तर भारतातील सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक व सांस्कृतिक परिवर्तनाचा आढावा घेतला गेला. या परिषदेत ज्ञानातील उपलब्धी, आव्हाने व भविष्यातील दिशा या विषयांवरील शोधनिबंधांचे सादरीकरण झाले. परिषदेचे समन्वयक म्हणून डॉ. राजीव पवार, सह समन्वयक डॉ. भावना मानेकर व डॉ. निशांत घुगे यांनी काम पाहिले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा. लक्ष्मण वाघ, , डॉ. सागर बडगे, डॉ. विजय लोहार, डॉ. मनोज महाजन, डॉ. विलास धनवे, डॉ. नचिकेत सूर्यवंशी, प्रा. गोपीचंद धनगर, प्रा.भूषण धनगर, प्रा. राहुल सुरळकर यांनी परिश्रम घेतले. या परिषदेत राज्यभरातील प्राध्यापक, संशोधक, अभ्यासक तसेच महाविद्यालयातील विभागप्रमुख, प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समन्वयक डॉ. राजीव पवार यांनी तर सूत्रसंचालन डॉ. योगेश महाले यांनी केले. आभार प्रदर्शन डॉ. निशांत घुगे यांनी केले.
