नवापूर (हेमंत विक्रम पाटील):
नवापूर तालुक्यात बेकायदेशीरपणे तत्सम लाकूड वाहतूक करणाऱ्यांविरोधात नवापूर पोलिसांनी धडक कारवाई करत आयशर वाहनासह सुमारे ४ लाख १५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई जामतलाव गावाच्या मुख्य रस्त्यावर दुपारी सुमारे १ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.
नवापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नियमित गस्तीवर असलेल्या पोलिसांना संशयास्पद अवस्थेत एक आयशर वाहन दिसून आले. वाहन क्रमांक MH-05-K-9816 थांबवून तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात तत्सम लाकूड भरलेले आढळून आले. यावेळी वाहनचालकाकडे लाकूड वाहतुकीसाठी आवश्यक असलेले अधिकृत परवाने व वैध कागदपत्रांची मागणी करण्यात आली असता चालकाने उडवाउडवीची उत्तरे देत कोणतीही समाधानकारक माहिती सादर केली नाही.
पोलिसांनी तत्काळ कारवाई करत वाहनचालक दिलीप दुकल्या कुवर (वय अंदाजे —, रा. खैरखूंडा, ता. साक्री, जि. धुळे) यास ताब्यात घेतले. पुढील तपासात आयशर वाहनाची किंमत अंदाजे ४ लाख रुपये, तर वाहनामधील सुमारे ५ टन तत्सम लाकडाची किंमत अंदाजे १५ हजार रुपये असल्याचे निष्पन्न झाले. अशा प्रकारे एकूण ४ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी नवापूर पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेले पोलीस हेड कॉन्स्टेबल अतुल पानपाटील यांनी फिर्याद दिली असून, त्यानुसार गुन्हा रजिस्टर क्रमांक ४४६/२०२५ नुसार महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १२४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल अनेश गावीत हे करीत आहेत. दरम्यान, बेकायदेशीर लाकूड वाहतूक, जंगल संपत्तीची तस्करी व पर्यावरणाचे नुकसान करणाऱ्यांविरोधात पुढील काळातही कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा नवापूर पोलिसांकडून देण्यात आला आहे.
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
