आदिवासी विकास विभागाच्या नंदुरबार येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत कार्यरत असलेल्या रेसिडेन्शियल स्कूलचे गणित विषयाचे शिक्षक जयकुमार शर्मा यांची अमेरिकेतील प्रतिष्ठेच्या फुलब्राईट टीचिंग एक्सलन्स अॅण्ड अचिव्हमेंट (Fulbright TEA) फेलोशिपसाठी निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीमुळे नंदुरबार जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रात मानाचा ठसा उमटला आहे. फुलब्राईट टीईए फेलोशिप कार्यक्रमाअंतर्गत जगभरातील ७५ देशांमधून १०० उत्कृष्ट शिक्षकांची निवड करण्यात येते. भारतातून निवड झालेल्या शिक्षकांमध्ये जयकुमार शर्मा यांचा समावेश असून, त्यांनी अत्यंत चुरशीच्या स्पर्धेतून ही संधी मिळवली आहे. या फेलोशिपच्या माध्यमातून ते दोन महिन्यांसाठी अमेरिकेत गणित विषयातील अध्यापन, शैक्षणिक संशोधन तसेच आधुनिक शिक्षण पद्धतींचे प्रशिक्षण घेणार आहेत.
या फेलोशिपसाठी मंत्रालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या विविध टप्प्यांच्या निवड प्रक्रियेतून त्यांची अंतिम निवड करण्यात आली. या कार्यक्रमाद्वारे जागतिक स्तरावरील नावीन्यपूर्ण अध्यापन तंत्रज्ञान, विद्यार्थी-केंद्रित शिक्षण पद्धती आणि आंतरराष्ट्रीय शैक्षणिक अनुभव आत्मसात करण्याची संधी त्यांना मिळणार आहे. हा अनुभव भविष्यात आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी उपयुक्त ठरणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. या उल्लेखनीय यशाबद्दल जनजाती व्यवहार मंत्रालय, नवी दिल्ली, महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास विभाग, नाशिक येथील अप्पर आयुक्त कार्यालय तसेच नंदुरबार प्रकल्प प्रशासनाच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी सहाय्यक संचालक रश्मी चौधरी, स्कूलचे प्राचार्य सतीश श्रीराम, नंदुरबार प्रकल्पाधिकारी डॉ. चंद्रकांत पवार, विस्तार अधिकारी निर्मल माळी यांच्यासह सहकारी व शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे कौतुक केले. जयकुमार शर्मा यांच्या या यशामुळे आदिवासी भागातील शिक्षकांसाठी नवी प्रेरणा निर्माण झाली असून, स्थानिक शैक्षणिक प्रयत्नांना आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळण्यास मदत होणार आहे.
