जळगाव – स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात सालाबादाप्रमाणे युवास्पंदन 2025 या स्नेहसंमेलनाची दिनांक 18 डिसेंबर व 19 डिसेंबर रोजी आयोजन करण्यात आलेले आहे.या कार्यक्रमाचे उद्घाटन दिनांक 18 डिसेंबर रोजी झाले.या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉ मृणालिनी फडणवीस शैक्षणिक संचालिका केसीई सोसायटी जळगाव ,ह्या होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे शैक्षणिक व सांस्कृतिक समन्वयक शशिकांत वडोदकर होते. यावेळी उपप्राचार्य प्रा आर बी ठाकरे, महाविद्यालयाच्या पर्यवेक्षिका प्रा स्वाती बऱ्हाटे व समन्वयक प्रा उमेश पाटील, स्नेहसंमेलन प्रमुख प्रा वर्षा पाटील व उपाध्यक्ष प्रा संदीप वानखेडे हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे उद्घाटन दीपप्रज्वलनाने झाले. सुरुवातीला सरस्वतीच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले. उद्घाटन सोहळ्याचे सूत्रसंचालन प्रा रूपम निळे यांनी केले.या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा किरण महाजन यांनी केले. डॉ मृणालिनी फडणवीस शैक्षणिक संचालिका के.सी.ई सोसायटी जळगाव,यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारे व्यासपीठ म्हणजे स्नेहसंमेलन होय. शैक्षणिक संपादणूक सोबतच विद्यार्थ्यांच्या आतील असलेल्या सुप्त गुणांचे प्रदर्शन झाल्यास त्यांच्या व्यक्तिमत्व विकासात नक्कीच हातभार लागत असतो असे मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणामध्ये शशिकांत वडोदकर यांनी शैक्षणिक विकासाबरोबर कलात्मक विकास साधणे हे विद्यार्थ्यांच्या आयुष्याचे लक्ष असले पाहिजे असे प्रतिपादन केले. यानंतर विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले होते. ‘महिला सुरक्षा’ हा प्रमुख आकर्षणाचा केंद्रबिंदू होता. रांगोळी स्पर्धेमध्ये 37 इतक्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला होता. ‘अयोध्येचा राम’ , ‘शिवराय’, ‘स्त्री भ्रुण हत्या’ या रांगोळ्यांनी प्रेक्षकांची मने वेधली. मेहंदी स्पर्धेमध्ये 29 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. यात अरेबिक हा मेहंदी प्रकार विद्यार्थ्यांनी साकारून स्पर्धेची शोभा वाढविली. रांगोळी स्पर्धेचे परीक्षक कमुदिनी नारखेडे ह्या होत्या तर चित्रकला व हस्तकला या स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रा पुरुषोत्तम घाटोळ व मेहंदी स्पर्धेचे परीक्षक प्राजक्ता कोतवाल यांनी कामकाज बघितले. काव्यवाचन व उत्स्फूर्त भाषण स्पर्धेत ईशांत साळी या विद्यार्थ्याने सादर केलेली कविता ‘राम’ सर्वांच्या मनाला भावली. तसेच पूर्वा भारंबे या विद्यार्थीनीच्या ‘मुलगी जे आईचे रूप असते’ या भावनाप्रधान कवितेच्या शब्दांनी श्रोत्यांची मने जिंकली. ‘जो अपना सा लगता है’ या झीनत पिंजारीने सादर केलेल्या कवितेने सर्वजण मंत्रमुग्ध झालेत. काव्यवाचनमध्ये 31 विद्यार्थ्यांनी तर उत्स्फूर्त भाषण मध्ये 10 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रा गोपीचंद धनगर व पीएम श्री केंद्रीय विद्यालयाचे प्रा गणेश वाघमारे यांनी काम बघितले. हास्यप्रधान खेळ या स्पर्धेमध्ये ‘मटकी फोड’, ‘ थर्माकॉल बॉल ॲन्ड स्ट्रॉ गेम’ व ‘बलून-कप’ गेम या रंगतदार स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले होती. या स्पर्धेचे परीक्षक प्रा प्रणव बेलोरकर आणि प्रा प्रविण कोल्हे हे होते. फूड फेस्टिवल स्पर्धेत विद्यार्थ्यांनी चविष्ट व खुमासदार पदार्थांची मांडणी केलेली होती. यामध्ये पाणीपुरी,खमंग, खस्ता पुरी, अंबाड्याची भाजी भाकरी, मुंगाची भजी, दाल पक्वान अप्पे चटणी, स्पायरल रोल्स , वोफेल्स, सॅण्डवीच तसेच साबुदाणा खिचडी या चविष्ट पदार्थांचा समावेश होता. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रा डॉ नम्रता महाजन व प्रा डॉ जुगलकिशोर दुबे यांनी काम बघितले. त्यानंतर दुपारी गरबा नृत्याचे आयोजन करण्यात आलेले होते. विद्यार्थ्यांनी रंगबिरंगी पारंपारिक वस्त्र परिधान करून सुंदर गरबा नृत्याची झलक दाखविली. गरबा स्पर्धेचे परीक्षक म्हणून जिया सरबागचंदानी व रीत लोकवाणी यांनी कामकाज बघितले. ‘यादों की बारात’ या गीतांच्या मैफिलीमध्ये सुंदर गीत गायनाचे प्रदर्शन करण्यात आले. यावेळी ‘वंदे मातरम्’ ला 150 वर्षे पुर्ण झाल्यानिमित्त महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व विद्यार्थी यांनी सामूहिक वंदे मातरम म्हणून मानवंदना दिली. उद्या या स्नेहसंमेलनाचा दुसरा दिवस असून दुसऱ्या दिवशी भारतीय प्रादेशिक व पारंपरिक वेशभूषा स्पर्धा, नृत्यकला स्पर्धा, गीत गायन व वादन स्पर्धा यांचे आयोजन करण्यात आलेले आहेत. कार्यक्रमाचा समारोप वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाने होणार असून कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून ॲड प्रविणचंद्र जंगले सहसचिव के. सी . ई.सोसायटी, जळगाव. लाभणार आहे.
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
