
जळगाव, दि. ६ –
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त जळगाव येथील मू.जे. महाविद्यालयात आज (६ डिसेंबर) त्यांना आदराने अभिवादन करण्यात आले.
महाविद्यालयातील सर्व विभागांचे प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने या अभिवादन कार्यक्रमास उपस्थित होते. महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित केलेल्या या कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण व दीपप्रज्वलन करून झाली.
यावेळी बोलताना प्रा. देवेंद्र इंगळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्याचा आणि भारतीय संविधानाच्या निर्मितीतील त्यांच्या अमूल्य योगदानाचा गौरव केला. सामाजिक न्याय, समानता आणि शिक्षणाचे महत्त्व या विषयांवर त्यांनी आपले विचार व्यक्त केले. तसेच, विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांच्या विचारांचे अनुकरण करून जीवनात प्रगती करावी, असे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमात काही प्राध्यापक व विद्यार्थ्यांनीही डॉ. आंबेडकरांच्या कार्यावर आधारित मनोगत व्यक्त केले. त्यांनी बाबासाहेबांनी दलित व उपेक्षित समाजासाठी केलेल्या संघर्षाबद्दल आणि त्यांच्या दूरदृष्टीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.यावेळी प्रा.जुगलकिशोर दुबे,प्रा.बी.एन.केसुर आदी उपस्थित होते.
उपस्थित सर्वांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करून, त्यांच्या समता आणि बंधुत्वाच्या मूल्यांना समाजात रुजविण्याचा संकल्प केला.
