राज्यातील उच्च शिक्षणातील विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी होणाऱ्या सामायिक प्रवेश परीक्षांच्या नोंदणी शुल्कात वाढ करण्याचा प्रस्ताव राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी कक्ष) तयार केला आहे. हा प्रस्ताव मंजुरीसाठी सरकारकडे पाठवण्यात आला आहे. या प्रस्तावानुसार परीक्षा नोंदणी शुल्कात १५० ते २५० रुपये वाढ अपेक्षित आहे.
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे १९ विविध सीईटींमार्फत ७२ विविध अभ्यासक्रमांची प्रवेश परीक्षा व प्रक्रिया राबवली जाते. यात अभियांत्रिकी, फार्मसीपासून नर्सिंग, बीएड, हॅाटेल मॅनेजमेंट अशा विविध अभ्यासक्रमांचा समावेश आहे. या अभ्यासक्रमांच्या परीक्षांसाठी पूर्वनोंदणी आवश्यक असते. या नोंदणीसाठी शुल्क आकारले जाते. संगणकीय प्रणालीद्वारे होणाऱ्या परीक्षांसाठी ८०० ते १००० रुपये शुल्क घेतले जाते. या परीक्षांसाठी गेल्या वर्षी १४ लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी बसले होते.
पुढील वर्षी ही संख्या १५ लाखांवर जाण्याची शक्यता आहे. परीक्षा केंद्रांवरील नियोजन, मनुष्यबळ, संगणकीय प्रणालींचे पुरवठादार, आदींसाठी होणाऱ्या खर्चासाठी विद्यार्थ्यांनी भरलेल्या परीक्षा शुल्कातून जमलेल्या निधीचा वापर केला जातो. गेल्या दोन वर्षांत या खर्चात झालेली वाढ लक्षात घेता आणि सीईटी कक्षाकडून राज्यभरात स्थापन होणाऱ्या विद्यार्थी सहाय्यता केंद्रासाठी येणाऱ्या खर्चाचा विचार करून नोंदणी शुल्कात वाढ करण्याचा प्रस्ताव सीईटी कक्षाने तयार केला आहे. त्यामुळे ही शुल्कवाढ जास्तीत जास्त २५० रुपयांपर्यंत प्रस्तावित असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच याबाबत चर्चा करूनच निर्णय घेण्यात येईल, असेही या अधिकाऱ्यांनी सांगितले.
