जळगाव- एम.जे. कॉलेजच्या सोहम् डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथी यांच्या वतीने आयोजित सहा दिवसीय एक्यूप्रेशर क्रॅश कोर्सचा समारोपीय कार्यक्रम 22 नोव्हेंबर 2025 रोजी उत्साहात संपन्न झाला. या कोर्समध्ये एक्यूप्रेशरचे मूलतत्त्व, शरीरातील ऊर्जा बिंदू, रोगनिवारणासाठी विविध दाबपद्धती तसेच स्व-उपचार तंत्र यांचा सखोल अभ्यास व प्रात्यक्षिक प्रशिक्षण देण्यात आले. समारोप प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून केसीई सोसायटीच्या शैक्षणिक संचालिका डॉ. मृणालिनी फडणवीस, एक्यूप्रेशर तज्ञ डॉ. पराग कुळकर्णी, सोहम योग विभागाचे संचालक डॉ. देवानंद सोनार व्यासपीठावर उपस्थित होते. मान्यवरांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, एक्यूप्रेशर ही प्राचीन उपचारपद्धती केवळ शारीरिक वेदना कमी करण्यासाठीच नव्हे, तर मानसिक संतुलनासाठीही उपयुक्त आहे. सहा दिवसांच्या कालावधीत सहभागी विद्यार्थ्यांनी सिद्धांताबरोबरच प्रत्यक्ष सरावातून उपचारपद्धती आत्मसात केल्या. कोर्स यशस्वी करण्यासाठी नागपूरचे तज्ञ डॉ. पराग कुळकर्णी व श्री. भवतीक जोशी यांचे मोलाचे योगदान राहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. श्रद्धा व्यास यांनी केले. कार्यक्रम प्रसंगी योग विभागातील प्रा. पंकज खाजबागे, डॉ.ज्योती वाघ उपस्थित होते. या कोर्समध्ये एकूण 21 जणांनी सहभाग नोंदविला. सहा दिवसात उत्तम शारीरिक लाभ झाल्याच्या प्रतिक्रिया सुद्धा सहभागी प्रशिक्षणार्थींनी व्यक्त केल्या. समारोप सोहळ्यात सर्व सहभागींना प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. यावेळी उपस्थितांनी या प्रशिक्षणाचा उपयोग समाजाच्या आरोग्यवर्धनासाठी करण्याचा संकल्प केला.
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
