धुळे : धुळे शहरातील नाभिक समाजाची सर्वांगीण प्रगती आणि शैक्षणिक क्षेत्रातील वाढता सहभाग पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. शहरातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व व नामांकित बिल्डर ‘अरुण बंगलोज, धुळे’चे संस्थापक श्री. जितेंद्र काशिनाथ बोरसे यांच्या कन्या कुमारी शिवानी बोरसे हिने वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करत प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, लोणी येथून डॉक्टर पदवी प्राप्त केली आहे. प्रवरामध्ये आयोजित भव्य ‘दीक्षांत समारंभा’त प्रवरा मेडिकल कॉलेजचे संचालक मा. राजेंद्र विखे पाटील यांच्या शुभहस्ते शिवानी बोरसे हिला अधिकृतरीत्या डॉक्टर पदवी प्रदान करण्यात आली. विशेष खास टोपी व गाऊन परिधान करून मंचावर उभारलेल्या शिवानीने हा आपल्या आयुष्यातील ‘स्वप्नपूर्तीचा क्षण’ कुटुंबासह अनुभवला. तिच्या हातात पदवी प्रमाणपत्र देताना संपूर्ण सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. शिवानीच्या या यशामागे तिचा सातत्यपूर्ण अभ्यास, वैद्यकीय क्षेत्रातील जिद्द, तसेच कुटुंबाचा मोठा पाठिंबा असल्याचे तिच्या जवळच्या मंडळींकडून सांगण्यात येते. शैक्षणिक वाटचालीच्या प्रारंभापासूनच तिने डॉक्टर होण्याचे स्वप्न जोपासले होते. कठोर मेहनत, निष्ठा आणि संयम यातून तिने हा टप्पा गाठला आहे. या यशाबद्दल तिचे वडील श्री. जितेंद्र बोरसे यांनी व्यक्त केलेला आनंदही विशेष उल्लेखनीय आहे. “शिवानीने वैद्यकीय क्षेत्र निवडून मानवसेवेची वाट धरली आहे, हा आमच्यासाठी मोठा अभिमानाचा क्षण आहे,” असे ते म्हणाले. नाभिक समाजाने शिवानीच्या या कामगिरीचे मनःपूर्वक स्वागत केले आहे. अखिल भारतीय जीवा सेना महिला जिल्हाध्यक्ष, जळगाव जिल्हा कार्यकारिणी तसेच समस्त नाभिक समाजाने – “कुमारी शिवानी ही समाजातील कन्यांसाठी प्रेरणादायी आदर्श आहे” अशा शब्दांत तिचे अभिनंदन केले. तिच्या पुढील वैद्यकीय कारकिर्दीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत असून समाजाच्या आशा-आकांक्षा तिच्याकडून अधिक उज्वल सेवाभावपूर्ण कार्याची अपेक्षा आहेत.
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
