जळगाव – दि. ०७/११/२०२५ ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात व्यवसाय मार्गदर्शन अंतर्गत ‘चित्रपट माध्यमाच्या जगात’ या विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना करिअरची विविध क्षेत्रे समजून घेण्यासाठी शाळेत हा उपक्रम राबविण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका श्रीमती प्रणिता झांबरे होत्या. कार्यशाळेसाठी प्रमुख वक्ते म्हणून चित्रपट दिग्दर्शक श्री. नितीन भास्कर, निर्माता श्री. प्रवीण वानखेडे आणि अभिनेत्री गीता निखरगे उपस्थित होते. तीनही पाहुण्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत चित्रपटसृष्टीतील संधी, कौशल्ये आणि वास्तव याबाबत उपयुक्त मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, चित्रपट माध्यम हे मेहनत, शिस्त, टीमवर्क आणि सर्जनशीलता यांच्या आधारावर उभे आहे. अभिनय, दिग्दर्शन, निर्मिती, लेखन, संपादन आणि तंत्रज्ञान क्षेत्रात विद्यार्थ्यांसाठी व्यापक करिअर संधी उपलब्ध आहेत. सराव, आत्मविश्वास आणि संवादकौशल्य यामुळे यशाची संधी अधिक दृढ होते. त्यांच्या सामूहिक विचारांनी विद्यार्थ्यांना प्रेरणा आणि योग्य दिशा मिळाली. यावेळी मुख्याध्यापिका श्रीमती प्रणिता झांबरे यांनी जाहीर केले की शाळेमार्फत लवकरच ‘शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धा’ आयोजित केली जाणार आहे. या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष चित्रिकरण, लेखन, अभिनय आणि संपादनाचा अनुभव मिळून त्यांची सर्जनशीलता अधिक विकसित होईल. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पर्यवेक्षक श्री नरेंद्र पालवे, श्री. महेंद्र नेमाडे सर, श्री. वेदप्रकाश गडदे, श्री. महेंद्र मिरकुटे, श्री. संदेश करलकर, तसेच श्री. चंदन खरे आणि श्री. तुषार भाऊ सोनवणे यांनी मोलाचे सहकार्य केले. तसेच कार्यक्रमासाठी श्री. निर्मल चतुर यांनी सुंदर फलक लेखन केले श्री. चंद्रकांत कोळी यांनी प्रभावी सूत्रसंचालन करून संपूर्ण कार्यक्रम आकर्षक व शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडला. मुख्याध्यापिका झांबरे मॅडम यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानत विद्यार्थ्यांच्या करिअर घडणीसाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले.
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
