जळगाव – किशोरआप्पा पाटील बहुउद्देशीय संस्था आणि द युनिक अकॅडमी (जळगाव) यांच्या विद्यमाने रविवारी पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी भवनात रविवारी सकाळी ११ वाजता आयोजित सामान्य ज्ञान स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना पूर्व नाव नोंदणी आवश्यक आहे. आमदार किशोर पाटील यांच्या संपर्क कार्यालयात देखील नाव नोंदणीची व्यवस्था केली आहे. एकूण १०० गुणांची स्पर्धा ही सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, बुद्धिमत्ता आणि गणिताच्या अभ्यासक्रमावर आधारीत असेल. स्पर्धा सर्वांसाठी मोफत आणि खुली असली, तरी नाव नोंदणीशिवाय कोणालाच सहभागी होता येणार नाही. स्पर्धेसाठी एक तासाची वेळ देण्यात येईल. प्रथम विजेत्यास रोख ११ हजार रूपये, द्वितीय विजेत्यास ७१०० रूपये, तृतीय विजेत्यास ५१०० रूपये, चौथ्या क्रमांकाच्या विजेत्यास ३१०० रूपये आणि पाचव्या क्रमांकाच्या विजेत्यास ११०० रूपयांचे रोख बक्षीस देण्यात येणार आहे. सदर स्पर्धा आमदार किशोर पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केली आहे.
