
जयपूर येथे केंद्रीय संस्कृत विद्यापीठाच्या स्थापना दिन सोहळ्यात झाला भव्य सत्कार जळगाव : स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी आयुष महेंद्र भामरे (इ.१२वी विज्ञान) याने भारतीय ज्ञान परंपरा (संस्कृत) ऑलिम्पियाड २०२५ मध्ये राष्ट्रीय स्तरावर द्वितीय क्रमांक पटकावून अभूतपूर्व यश संपादन केले असून, त्याचा सत्कार आज दि. १५ ऑक्टोबर २०२५ रोजी जयपूर येथे केंद्रीय संस्कृत विद्यापीठाच्या वतीने झालेल्या स्थापना दिन सोहळ्यात मोठ्या उत्साहात करण्यात आला. या कार्यक्रमाला देशभरातील नामवंत संस्कृत पंडित, विद्यापीठाचे कुलगुरू, प्राध्यापक, विविध राज्यांतील विजेते विद्यार्थी व पालक उपस्थित होते. या भव्य सोहळ्यात आयुषला सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व रु. ५,०००/- ची रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. विद्यापीठाच्या कुलगुरूंनी स्वतःच्या हस्ते आयुषला सन्मानचिन्ह प्रदान करताना त्याच्या परिश्रमाचे आणि भारतीय संस्कृत परंपरेवरील ज्ञानाचे कौतुक केले. ‘भारतीय ज्ञान परंपरा ऑलिम्पियाड’ ही स्पर्धा केंद्रीय संस्कृत विद्यापीठ, नवी दिल्ली यांच्या वतीने प्रथमच राष्ट्रीय स्तरावर आयोजित करण्यात आली होती. देशभरातून हजारो विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. वेद, उपनिषद, शास्त्र, भारतीय गणित आणि सांस्कृतिक परंपरा या विषयांवरील अत्यंत आव्हानात्मक प्रश्नपत्रिकेत आयुषने १०० पैकी १०० गुण मिळवत आपली असामान्य विद्वत्ता सिद्ध केली. या राष्ट्रीय यशामुळे संपूर्ण जळगाव जिल्हा आणि के.सी.ई. सोसायटी अभिमानाने उजळून निघाली आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल के.सी.ई. संस्थेचे अध्यक्ष प्रज्ञावंत नंदकुमार बेंडाळे, प्राचार्य डॉ. सं.ना. भारंबे, उपप्राचार्य प्रा. आर.बी. ठाकरे, पर्यवेक्षिका प्रा. स्वाती बऱ्हाटे, समन्वयक प्रा. उमेश पाटील, संस्कृताध्यापक प्रा. अर्जुनशास्त्री मेटे, तसेच सर्व शिक्षकवृंद व सहाध्यायींनी आयुषचे मनःपूर्वक अभिनंदन केले. कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. आर. बी. ठाकरे म्हणाले, “आयुषचे हे यश केवळ महाविद्यालयाचे नव्हे तर संपूर्ण शहराचे आणि राज्याचे अभिमानाचे आहे. भारतीय ज्ञान परंपरेच्या स्पर्धेत त्याने मिळवलेले हे स्थान पुढील पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल.”
