जळगाव –जळगाव शहरात सोन्याच्या लालसेने मृतदेहाच्या अस्थींची चोरी होण्याचा दुसरा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गेल्या आठवड्यात मेहरूण परिसरात झालेल्या घटनेची पुनरावृत्ती सोमवारी सकाळी शिवाजीनगर स्मशानभूमीत झाली. आठवडाभरात घडलेल्या या दोन घटनांमुळे नागरिकांमध्ये तीव्र चिंता आणि संताप व्यक्त होत आहे.
मेहरूण येथील पहिली घटना: गायत्रीनगरातील रहिवासी असलेल्या छबाबाई काशिनाथ पाटील (७४) यांचे ५ ऑक्टोबर रोजी निधन झाले. दुसऱ्या दिवशी मेहरूण भागातील महापालिकेच्या स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. छबाबाई यांना सोन्याचे दागिने अंगावरच ठेवून अंत्यसंस्कार करण्याची इच्छा होती, त्यानुसार त्यांच्या कुटुंबियांनी सुमारे दोन तोळे (२० ग्रॅम) वजनाचे सोन्याचे दागिने अंगावर ठेवून अंत्यसंस्कार केले होते. मात्र, तिसऱ्या दिवशी नातेवाईक अस्थी गोळा करण्यासाठी स्मशानभूमीत पोहोचले असता, छबाबाई यांचे डोके, हात आणि पायाच्या अस्थी गायब झाल्याचे पाहून त्यांना मोठा धक्का बसला. सोन्यासाठी अस्थी चोरी झाल्याचा आरोप पाटील कुटुंबियांनी केला होता.
शिवाजीनगर येथील दुसरी घटना: मेहरूण येथील घटनेची चर्चा असतानाच, सोमवारी सकाळी शिवाजीनगर स्मशानभूमीतही तसाच प्रकार घडल्याचे उघड झाले. खडके चाळीत राहणाऱ्या जिजाबाई पाटील यांच्या निधनानंतर त्यांच्यावर शिवाजीनगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाले होते. सोमवारी सकाळी त्यांचे नातेवाईक अस्थी जमा करण्यासाठी गेले असता, अंत्यसंस्कार केलेल्या जागेवरून डोक्याच्या आणि पायाच्या भागातील राख आणि अस्थी गायब झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. जिजाबाई पाटील यांच्या अंगावरील सुमारे चार ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिनेही यावेळी चोरट्यांनी लंपास केले होते. विशेष म्हणजे, चोरट्यांनी अस्थींसह दागिने चोरले असले तरी, जिजाबाईंवर अंत्यसंस्कार झालेल्या ठिकाणी पंचपक्वान्नाचे पान ठेवल्याचे आढळले. अंधश्रद्धेपोटी चोरट्यांनी हे कृत्य केले असावे, असा अंदाज व्यक्त होत आहे.
प्रशासनाच्या दुर्लक्षावर नाराजी: आठवडाभराच्या अंतराने दोन वेळा स्मशानभूमीतून सोन्याच्या लालसेने महिलांच्या अस्थींची चोरी झाल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. मेहरूण भागात पहिली घटना घडली तेव्हाच स्मशानभूमींमध्ये सुरक्षा रक्षक नेमण्यासह सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी नागरिकांनी केली होती. मात्र, महापालिका प्रशासनाने या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने चोरट्यांची थेट स्मशानभूमीतील अस्थी चोरण्यापर्यंत मजल गेली आहे. या प्रशासकीय दुर्लक्षामुळे नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
