भडगाव –
येथील पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित सौ. रजनीताई नानासाहेब देशमुख कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या वाणिज्य आणि अर्थशास्त्र विभागाच्या वतीने औद्योगिक सहलीचे आयोजन करण्यात आले होते. ही सहल जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेड, जळगाव येथे नेण्यात आली. या औद्योगिक सहलीदरम्यान विद्यार्थ्यांनी जैन इरिगेशन सिस्टीम्सच्या विविध विभागांना भेट दिली. त्यामध्ये टिश्यू कल्चर रोप नर्सरी, आशिया खंडातील सर्वात मोठी टिश्यू कल्चर लॅब, तसेच फ्युचर फार्मिंग सेंटर यांचा समावेश होता. विद्यार्थ्यांना आधुनिक शेतीत वापरल्या जाणाऱ्या ठिबक सिंचन, तुषार सिंचन प्रणाली, तसेच विविध शेतीसंबंधी स्मार्ट अवजारे आणि तंत्रज्ञान यांची सखोल माहिती यावेळी जैन इरिगेशन सिस्टीमच्या वतीने देण्यात आली.
या सहली दरम्यान विद्यार्थ्यांनी ‘गांधी तीर्थ’ या ठिकाणी भेट देऊन महात्मा गांधीजींच्या जीवनकार्याविषयी मौल्यवान माहिती मिळवली. जैन इरिगेशनचे कुलकर्णी साहेब आणि इंगळे साहेब यांनी विद्यार्थ्यांना औद्योगिक प्रक्रिया आणि गांधी तीर्थाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच संजय पाटील यांचे सहकार्य लाभले.
संपूर्ण परिसर निसर्गरम्य आणि प्रेरणादायी वातावरणाने परिपूर्ण असल्याने विद्यार्थ्यांनी उत्साहाने या सहलीत सहभाग घेतला. या औद्योगिक सहलीमध्ये अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. बी. एस. भालेराव, वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. सचिन हडोळतीकर, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. गजानन चौधरी आणि अर्थशास्त्र विभागाचे डॉ. जनार्दन देवरे यांच्यासह वाणिज्य आणि अर्थशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
या सहलीमुळे विद्यार्थ्यांना औद्योगिक क्षेत्रातील व्यावहारिक ज्ञान आणि आधुनिक शेती तंत्रज्ञानाची ओळख मिळाली. ही सहल विद्यार्थ्यांसाठी अत्यंत शैक्षणिक आणि प्रेरणादायी ठरली.
