स्वच्छ ग्राम स्पर्धेत जरंडी अव्वल — संभाजीनगर जिल्ह्यात सलग तिसऱ्यांदा मानाचा तुरा
सोयगाव / प्रतिनिधी – विजय पगारे
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील मौजे जरंडी ग्रामपंचायतीने पुन्हा एकदा स्वच्छतेचा आदर्श घालून दिला आहे. संत गाडगेबाबा स्वच्छ ग्राम स्पर्धा २०२४–२५ मध्ये जरंडीने तब्बल १८१ गुण मिळवून जिल्ह्यात अव्वल स्थान पटकावले आहे.
या यशामुळे जरंडी ग्रामपंचायतीने सलग तिसऱ्यांदा “स्वच्छ ग्राम” पुरस्कार मिळवण्याचा मान मिळवला असून, गावाचा तोरा संपूर्ण जिल्ह्यात पुन्हा एकदा उजळला आहे.
शुक्रवारी सायंकाळी सात वाजता जाहीर झालेल्या निकालात जरंडीचा उल्लेख अव्वल ठरल्याची घोषणा होताच गावात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले.
या यशामागे सरपंच स्वाती पाटील, उपसरपंच संजय पाटील, वंदनाताई पाटील, मधुकर पाटील, कृषिभूषण रवींद्र पाटील, दिलीप पाटील, संजीवन सोनवणे, अमृत राठोड, तसेच आशा सेविका, अंगणवाडी सेविका आणि आरोग्य विभागाचे कर्मचारी यांचा मोलाचा सहभाग आहे, अशी माहिती ग्रामपंचायत अधिकारी सुनील मंगरुळे यांनी दिली.
जरंडीच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल गटविकास अधिकारी शिवाजी यमुलवाड, तहसीलदार मनीषा मेने, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गीतेश चावडा यांनी ग्रामपंचायतीचे अभिनंदन केले.
ग्रामपंचायत अधिकारी सुनील मंगरुळे, संतोष पाटील, सतीश बाविस्कर, अंबु राठोड आणि सहकाऱ्यांनी या स्वच्छता मोहिमेत विशेष पुढाकार घेतला होता.
