मागासवर्गीय प्राध्यापक संघटनेच्या जळगाव जिल्हा मेळाव्यात प्राध्यापकांच्या प्रश्नांवर सखोल कार्यशाळा संपन्न
जळगाव, दि. २ ऑगस्ट : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठीय व महाविद्यालयीन मागासवर्गीय प्राध्यापक संघटनेतर्फे रविवारी जळगाव येथे
जिल्हास्तरीय मेळावा व कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. सकाळी ९.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत झालेल्या या दिवसभराच्या कार्यशाळेत प्राध्यापक, सीएचबी (CHB) शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विविध महाविद्यालयांतील प्रतिनिधींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात ‘प्राध्यापकांचा कार्यभार आणि शासनाचे धोरण’ या विषयावर प्रा. डॉ. भूपेंद्र केसूर यांनी मार्गदर्शन केले. बदलत्या शैक्षणिक धोरणांचा प्राध्यापकांवरील परिणाम, वाढता प्रशासकीय ताण आणि उच्च शिक्षण क्षेत्रातील आव्हाने यांचे त्यांनी सविस्तर विश्लेषण केले.
सत्रानंतर महाविद्यालये व विद्यापीठांतील प्राध्यापकांच्या विविध समस्या, सूचना आणि संघटनात्मक प्रश्नांवर मुक्त चर्चा झाली. ‘विद्यार्थी संघटनेच्या दिशेने प्रवास कसा करावा?’ या विषयावर प्रा. डॉ. साहेब पडलवार यांनी विद्यार्थी संघटनांची आवश्यकता, नेतृत्व विकास आणि शैक्षणिक चळवळींमध्ये विद्यार्थ्यांच्या सहभागाचे महत्त्व स्पष्ट केले.
दुपारच्या सत्रात विनाअनुदानित (CHB) प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समस्या, त्यावरील उपाययोजना आणि संघटनात्मक भूमिका या विषयावर प्रा. विजय घोरपडे, श्री. भगवान तायडे, श्री. संतोष मनुरे तसेच विद्यापीठातील प्रतिनिधींनी मार्गदर्शन केले. यानंतर सीएचबी प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपल्या समस्या मांडत विविध सूचना केल्या.
महिला प्राध्यापकांच्या समस्या, कार्यस्थळी येणारी आव्हाने आणि संघटनेतील त्यांचा सक्रिय सहभाग या विषयावर प्रा. डॉ. सुरेखा पालवे (मॅनेजमेंट कौन्सिल सदस्य, कबचौ उमवि, जळगाव) यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर उपस्थित महिला प्राध्यापकांनीही आपली मते मांडली.
कार्यशाळेतील पुढील सत्रात ‘मागासवर्गीय प्राध्यापकांच्या संशोधनाची दिशा’ या विषयावर प्रा. डॉ. जयवंत मगर (सिनेट सदस्य कबचौ उमवि, जळगाव) आणि प्रा. डॉ. विशाल पराते ( कबचौ उमवि, जळगाव) यांनी संशोधनातील गुणवत्ता, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, संशोधन निधी आणि प्रकाशनाच्या संधी यावर मार्गदर्शन केले.
‘समाजकार्य प्राध्यापकांच्या प्रवासात मागासवर्गीय प्राध्यापक संघटना’ या विषयावर डॉ. राहुल निकम यांनी आपले अनुभव कथन केले. समाजकार्य महाविद्यालयातील प्राध्यापकांचे प्रश्न शासन तथा प्रशासन स्तरावर मांडून ते सोडविण्यासाठी संघटनेने आजपर्यंत दिलेल्या योगदानावर त्यांनी प्रकाशझोत टाकत कृतज्ञता व्यक्त केली. त्यानंतर ‘मागासवर्गीय प्राध्यापक संघटनेच्या वर्षभरातील वाटचालीचा आढावा’ संघटनेचे सचिव डॉ. अनिल हिवाळे यांनी सादर करत संघटनेच्या विविध उपक्रमांची, लढ्यांची आणि भविष्यातील कृती आराखड्याची माहिती दिली.
समारोपापूर्वी प्राध्यापकांनी मुक्त संवादातून विविध प्रश्न, सूचना आणि अपेक्षा मांडल्या. अध्यक्षीय मनोगतात प्रा. डॉ. जयवंत मगर यांनी संघटनात्मक एकजूट, शैक्षणिक गुणवत्ता आणि मागासवर्गीय प्राध्यापकांच्या हक्कांसाठी सातत्याने संघर्ष करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. योगेश महाले आणि प्रा. संजीव साळवे यांनी केले. तर कार्यशाळेतील सूचना व शिफारसींची नोंद प्रा. डॉ. शरद बिऱ्हाडे आणि डॉ. राजेश सगळगिळे यांनी केली. आभार प्रदर्शन प्रा. डॉ. विशाल पराते यांनी केले.
या मेळावा व कार्यशाळेत प्राध्यापकांच्या सेवा, संशोधन, संघटनात्मक बळकटी, सीएचबी शिक्षकांचे प्रश्न, महिला प्राध्यापकांचे प्रश्न आणि विद्यार्थी संघटनांशी संवाद अशा विविध विषयांवर सखोल चर्चा होऊन भविष्यातील कृतीसाठी महत्त्वपूर्ण सूचना पुढे आल्या. जळगाव जिल्ह्यातील १६८ प्राध्यापकांनी उपस्थित राहून कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या कार्यशाळेत सहभागी होणाऱ्या सर्व प्राध्यापकांनी संघटनेच्या कार्याबद्दल आणि मेळाव्याबद्दल समाधान व्यक्त केले.
