पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित सौ. रजनीताई नानासाहेब देशमुख कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, भडगाव येथे राष्ट्रीय सेवा योजना एककातर्फे एड्स दिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालय, भडगाव येथील समुपदेशक नामदेव पाटील यांचे जनजागृतीपर व्याख्यान आयोजित करण्यात आले. आपल्या व्याख्यानात पाटील यांनी एड्स या रोगाचे गांभीर्य, त्याची कारणे तसेच त्यावरील उपाय यांची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली. भारतात एड्स निर्मूलनाची मोहीम आरोग्य यंत्रणेने अत्यंत सुनियोजित व मोठ्या प्रमाणात राबविल्यामुळे भारत आता पूर्णपणे एड्स निर्मूलनाच्या दिशेने वाटचाल करतो आहे, असेही त्यांनी बोलताना नमूद केले. यावेळी एचआयव्ही एड्स आजाराविषयी विद्यार्थ्यांना शपथ देण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. दीपक मराठे होते. त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने एड्स जनजागृतीविषयी आयोजित केल्या जाणाऱ्या उपक्रमांचे कौतुक केले.
याप्रसंगी प्रा. एस. एम. झाल्टे, डॉ. अतुल देशमुख, ग्रामीण रुग्णालयाच्या रूपाली पाटील, पत्रकार नरेंद्र पाटील तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाला विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. बी. एच. पाटील यांनी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले.

