महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची पार्सल सेवा तीन महिन्यांपासून ठप्प
जळगाव 2 ऑक्टोंबर 26
व्यापारी, उद्योजकांसह नागरिकांची मोठी गैरसोय
गावामध्ये डिलिव्हरी कशी होणार? एसटीची पार्सल सेवा झाली बंद
ग्रामीण भागातील नागरिकांसाठी तसेच व्यापारी, उद्योजक आणि सर्वसामान्यांसाठी उपयुक्त ठरणारी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (एसटी) पार्सल सेवा गेल्या तीन महिन्यांपासून ठप्प झाली आहे. त्यामुळे एका गावातून दुसऱ्या गावात तसेच ग्रामीण भागातून शहरात साहित्य, औषधे, स्पर्धा परीक्षांचे पुस्तक, साप्ताहिक मासिक वर्तमानपत्रे, वैद्यकीय साहित्य आणि इतर वस्तू पाठविण्यासाठी नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
एसटीच्या माध्यमातून राबविण्यात येणारी पार्सल सेवा ही ग्रामीण भागासाठी महत्त्वाची सुविधा मानली जाते. एसटीच्या बससेवेच्या माध्यमातून कमी खर्चात आणि सुरक्षितपणे पार्सल पाठविण्याची सुविधा उपलब्ध होती. मात्र, ही सेवा बंद झाल्याने नागरिकांना खासगी कुरिअर अथवा मालवाहतूक सेवांचा आधार घ्यावा लागत आहे. खासगी कंपन्यांकडून तुलनेने अधिक दर आकारले जात असल्याने लहान व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांवर आर्थिक भार पडत आहे.
कुरिअर, मालवाहतूक सेवांवर वाढतोय बोजा
एसटी पार्सल सेवा बंद असल्यामुळे नागरिकांना नाईलाजाने खासगी कुरिअर सेवा किंवा ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून माल पाठवावा लागत आहे. खासगी कंपन्या एसटीच्या तुलनेत तिप्पट-चौपट भाडे आकारत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. त्यामुळे लहान-सहान पार्सल पाठविण्यासाठीही मोठा अतिरिक्त आर्थिक खर्च करावा लागत आहे.
विशेषतः औषधे, वैद्यकीय साहित्य तसेच इतर आवश्यक वस्तू ग्रामीण भागात पाठविताना अडचणी निर्माण होत आहेत. एसटी पार्सल सेवेचा सर्वात मोठा फायदा आणीबाणीच्या परिस्थितीत वैद्यकीय साहित्य व औषधांची वाहतूक करण्यासाठी होत होता.
एसटीकडून काय व्यवस्था?
एसटी प्रशासनाकडून सध्या पार्सल सेवेबाबत काही पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच नवीन कंत्राटदार नियुक्त करण्याची प्रक्रिया वरिष्ठ पातळीवर सुरू असून, लवकरच पार्सल सेवा पूर्ववत सुरू करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.
नागरिकांसह व्यापारी, व्यावसायिकांना फटका
एसटी पार्सल सेवेचा सर्वाधिक उपयोग स्थानिक व्यापारी, छोटे व्यावसायिक, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांकडून केला जात होता. कपडे, सुटे भाग, गृहपयोगी वस्तू तसेच विविध प्रकारचे साहित्य गावोगावी पाठविण्यासाठी ही सेवा उपयोगी ठरत होती. मात्र, सेवा बंद असल्याने व्यापार ठप्प होण्यासोबतच आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागत आहे.
कंत्राट रद्द झाल्याने गैरसोय
एसटी महामंडळाची पार्सल सेवा कंत्राट पद्धतीने सुरू होती. संबंधित कंपनीचे कंत्राट संपल्यानंतर ही सेवा थांबली असल्याचे समोर आले आहे. प्रशासनाने तातडीने नवीन कंत्राटदाराची नियुक्ती करून पार्सल सेवा पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी व्यापारी व नागरिकांकडून होत आहे.
ग्रामीण भागातील नागरिकांसाठी अत्यावश्यक ठरत असलेली एसटीची पार्सल सेवा तातडीने सुरू करण्याची गरज असून, यामुळे व्यापारी, उद्योजक आणि सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
