धरणगाव तालुक्यातील युवकांसाठी २९ सप्टेंबर रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन जळगाव, दि. २८ (जिमाका) : कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या निर्देशानुसार पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ अंतर्गत मंगळवार, दि. २९ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ९ वाजता रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
हा मेळावा कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथील यूएसीटी सेमिनार हॉल तसेच एस.एस.बी.टी. अभियांत्रिकी महाविद्यालय, बांभोरी, ता. जळगाव येथे आयोजित करण्यात आला आहे.
या मेळाव्यात विविध नामवंत कंपन्यांचे अधिकारी उपस्थित राहून पात्र उमेदवारांच्या थेट मुलाखती घेणार असून, निवड झालेल्या उमेदवारांना जागेवरच नियुक्तीपत्रे देण्यात येणार आहेत. इयत्ता १० वी, १२ वी, आयटीआय, पॉलिटेक्निक, अभियांत्रिकी तसेच कला, विज्ञान व वाणिज्य शाखेतील पदवी व पदविकाधारक उमेदवारांना सहभागी होता येणार आहे.
तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींनी या रोजगार मेळाव्यात मोठ्या संख्येने सहभागी होऊन रोजगाराच्या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन औद्योगिक प्रशिक्षण संस्था,धरणगावचे प्राचार्य यांच्या वतीने करण्यात आले आहे.
