जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरला खासगी व्यवसायाबाबत खुलासा नोटीस
जळगाव : जिल्हा रुग्णालयातील व्यवसायोपचार तज्ज्ञ डॉ. अमित मनोहर वागदे यांच्याविरोधात खासगी व्यवसाय केल्याबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सकांनी त्यांना खुलासा सादर करण्याची नोटीस बजावली आहे.
विवेकानंद नगर, जिल्हा पेठ, जळगाव येथील श्री. रविराज सुभाष हटकर यांनी यासंदर्भात तक्रार अर्ज जिल्हा रुग्णालयाच्या कार्यालयात सादर केला होता. तक्रारीनुसार, डॉ. वागदे हे शासकीय सेवेत कार्यरत असतानाही विनापरवानगी खासगी सेंटर चालवून व्यवसाय करीत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या तक्रारीचा संदर्भ देत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. स्वप्निल वि. सांगळे यांनी डॉ. वागदे यांना महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ मधील नियम १६ नुसार शासकीय सेवेत कार्यरत असताना कोणतीही खासगी नोकरी अथवा व्यवसाय करता येत नसल्याचे नमूद केले आहे.
तक्रारीबाबत दोन दिवसांत लेखी खुलासा सादर करण्याचे आदेश नोटीसमधून देण्यात आले आहेत. निर्धारित मुदतीत खुलासा सादर न केल्यास किंवा तो असमाधानकारक आढळल्यास शासन नियमानुसार पुढील शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात येईल, असा इशाराही नोटीसमध्ये देण्यात आला आहे.
दरम्यान, या प्रकरणातील तक्रारीतील आरोपांबाबत संबंधित डॉक्टरांचा खुलासा काय असणार, याकडे लक्ष लागले आहे.
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
