भडगाव येथील देशमुख महाविद्यालयात राष्ट्रीय रसायनशास्त्र दिन उत्साहात साजरा
पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित सौ. रजनीताई नानासाहेब देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात भारताचे महान वैज्ञानिक तथा भारतीय रसायनशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जाणारे आचार्य प्रफुल्लचंद्र रे यांच्या १६६ व्या जयंतीनिमित्त ‘राष्ट्रीय रसायनशास्त्र दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला आचार्य प्रफुल्ल चंद्र रे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. एन. गायकवाड होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.जी.एस. अहिरराव उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना रसायनशास्त्र विभागप्रमुख प्रा. एस. एम. झाल्टे यांनी आचार्य प्रफुल्लचंद्र रे यांच्या वैज्ञानिक कार्याचा, स्वदेशी उद्योग उभारणीत दिलेल्या योगदानाचा तसेच विद्यार्थ्यांनी संशोधन व विज्ञान क्षेत्राकडे वळण्याची गरज यांचा उल्लेख केला. प्रमुख पाहुणे प्रा.जी.एस. अहिरराव यांनी विद्यार्थ्यांना विज्ञाननिष्ठ दृष्टीकोन विकसित करून संशोधनाची आवड जोपासण्याचे आवाहन केले. अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. एन. एन. गायकवाड यांनी रसायनशास्त्राचे आधुनिक विज्ञान व उद्योग क्षेत्रातील महत्त्व स्पष्ट करून विद्यार्थ्यांना वैज्ञानिक विचारसरणी अंगीकारण्याचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सागर पाटील यांनी केले, तर आभारप्रदर्शन डॉ. प्राजक्ता देशमुख यांनी केले. यावेळी भौतिकशास्त्र विभागप्रमुख प्रा. ए. एन. टेमकर, प्रा. श्रद्धाराणी देशमुख, प्रा. अंजली माळी, प्रा. निशिगंधा बोरसे तसेच शिक्षकेतर कर्मचारी दिलीप चौधरी व सुनील पाटील उपस्थित होते. महाविद्यालयातील विज्ञान विभागातील मोठ्या संख्येने विद्यार्थी-विद्यार्थिनींनी कार्यक्रमात सहभाग घेतला. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.
