पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित सौ. रजनीताई नानासाहेब देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त कवी, लेखक व कादंबरीकार विष्णू वामन शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला. मराठी विभागाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. दीपक मराठे होते.
कार्यक्रमाची सुरुवात कुसुमाग्रजांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून झाली. याप्रसंगी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना डॉ. दीपक मराठे म्हणाले की, तुम्ही कोणत्याही क्षेत्रात गेले; आपले भविष्य उज्वल केले तरी मातृभाषेची कास सोडता कामा नये. विविध क्षेत्रातील उत्तुंग यश मिळवलेल्या व्यक्तींचे मातृभाषेतील वाचन प्रचंड असते त्यामुळे ते यशस्वी होऊ शकतात. वाचन हा आपले व्यक्तिमत्व घडविण्यासाठी आवश्यक असणारा मूलभूत घटक आहे.
मराठी विभागप्रमुख डॉ. अतुल देशमुख यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट करताना मराठी विभाग राबवत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. मातृभाषेतून घेतलेले शिक्षणच माणसाचे व्यक्तिमत्व खऱ्या अर्थाने विकसित करते, असे सांगितले. तसेच साहित्याचा आपल्या जीवनातील यशस्वी वाटचालीसाठी कसा उपयोग होतो, हे विशद केले.
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मराठी विभागाच्या वतीने निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत प्रथम क्रमांक कु. ज्योती सुरेश महाजन (तृतीय वर्ष कला) या विद्यार्थिनीने पटकावला, द्वितीय क्रमांक कु. भावेश्वरी जिजाबराव पाटील (द्वितीय वर्ष वाणिज्य) हिने मिळवला तर तृतीय क्रमांक अन्नूर मोहम्मद शेख (द्वितीय वर्ष कला) याने प्राप्त केला.
विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजावी व वाढावी यासाठी मराठी विभागातर्फे शिवजयंतीचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना ॲड. गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता?’ या गाजलेल्या पुस्तकाच्या प्रति विनामूल्य वितरीत करण्यात आल्या.
याप्रसंगी व्यासपीठावर इतिहास विभागप्रमुख डॉ. सी. एस. पाटील, शारीरिक शिक्षण व क्रीडा संचालक डॉ. दिनेश तांदळे उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन प्रा. अधिकराव पाटील यांनी केले. कार्यक्रमाला डॉ. बी. एस. भालेराव, डॉ. सचिन हडोळतीकर, डॉ. गजानन चौधरी, डॉ. जनार्दन देवरे, प्रा. प्रवीण देसले, डॉ. प्राजक्ता देशमुख, प्रा. निशिगंधा बोरसे तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
