आदिवासी विद्यार्थ्यांसाठी ‘प्रकाशवाटा’ कार्यक्रमाचे उद्घाटन

नवापूर, दि. २ : आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या विविध संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या ‘प्रकाशवाटा’ या कार्यक्रमाचे उद्घाटन महात्मा गांधी जयंती व माजी पंतप्रधान स्वर्गीय लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधून २ ऑक्टोबर रोजी शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा, खडकी, ता. नवापूर येथे करण्यात आले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन मा. जिल्हाधिकारी महोदया डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, नंदुरबारचे प्रकल्प अधिकारी श्री. चंद्रकांत पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या निमित्ताने शाळेचे मुख्याध्यापक श्री. सुनील पाटील यांनी पारंपरिक पद्धतीने प्रवेशद्वाराजवळ मान्यवर पाहुण्यांचे स्वागत व आदरातिथ्य केले. ‘प्रकाशवाटा’ या उपक्रमाच्या माध्यमातून आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या दिशेने पुढे जाण्यासाठी विविध शैक्षणिक संधी व मार्गदर्शन उपलब्ध होणार आहे.
या कार्यक्रमास शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाच्या आकांक्षांना योग्य दिशा देण्यासाठी ‘प्रकाशवाटा’ हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
