भटके-विमुक्त हक्क व प्रमाणपत्र अभियानातून विविध प्रमाणपत्रे व योजनांचा लाभ मिळणार
जळगाव, दि. 27 (जिमाका) : विमुक्त जाती व भटक्या जमातीतील नागरिकांना विविध शासकीय प्रमाणपत्रे, ओळखपत्रे तसेच शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ सुलभपणे मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता’ अभियानांतर्गत जळगाव जिल्ह्यात दि. २७ ते २९ सप्टेंबर २०२६ या कालावधीत ‘भटके-विमुक्त हक्क व प्रमाणपत्र अभियान’ राबविण्यात येत आहे.
या अभियानांतर्गत महसूल विभाग, इतर मागास बहुजन कल्याण विभाग तसेच विविध शासकीय विभागांच्या समन्वयातून मंडळ व तालुका स्तरावर वस्तीनिहाय विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.
एरंडोल तालुक्यात गणेशनगर, आनंदनगर व खेडगाव येथे दि. २७, २८ व २९ सप्टेंबर रोजी, धरणगाव तालुक्यात ग्रामपंचायत सभागृह, पोखरी येथे दि. २८ सप्टेंबर रोजी,पाचोरा तालुक्यात वडगाव आंबे व पिंपळगाव बु. येथे दि. २९ व ३० सप्टेंबर रोजी, बोदवड तालुक्यात पळसखेडा चक्कर (तांडा वस्ती) येथे दि. २९ सप्टेंबर रोजी, भुसावळ तालुक्यात मांडवेदिगर-भिलमळी येथे दि. २९ सप्टेंबर रोजी शिबिर होणार आहे.
मुक्ताईनगर तालुक्यात ग्रामपंचायत सभागृह, बोरखेडा, चोपडा तालुक्यात यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत समाज मंदिर, गोरगावले बु.,२८ सप्टेंबर रोजी तर जामनेर तालुक्यात ग्रामपंचायत, महुखेडा, चाळीसगाव तालुक्यात विठ्ठल मंदिर, सेवानगर, आणि रावेर तालुक्यात सेवालाल महाराज मंदिर,पाल येथे दि. २९ सप्टेंबर रोजी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या विशेष अभियानामध्ये पात्र नागरिकांना आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र, शिधापत्रिका, जात प्रमाणपत्र, आयुष्मान भारत कार्ड, उत्पन्नाचा दाखला, नॉन-क्रिमीलेयर प्रमाणपत्र, रहिवास/अधिवास दाखला, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, दिव्यांग प्रमाणपत्र आदी आवश्यक कागदपत्रे व प्रमाणपत्रे उपलब्ध करून देण्यासाठी कार्यवाही करण्यात येणार आहे. तसेच श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, संजय गांधी निराधार अनुदान योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, प्रधानमंत्री आवास योजना, पीएम किसान योजना यांसह विविध शासकीय योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.
जळगाव जिल्ह्यातील विमुक्त जाती व भटक्या जमातीतील नागरिकांनी आपल्या परिसरातील संबंधित विशेष शिबिरात आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहून या अभियानाचा लाभ घ्यावा, तसेच पात्रतेनुसार विविध शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण,विभाग जळगाव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.
