कजगाव रेल्वेस्थानकावरून पार्सल सेवा सुरू
कजगाव, ता. भडगाव : प्रवाशांसह व्यापारी, तसेच कृषी व व्यावसायिक क्षेत्राला अधिक सक्षम व सुलभ पार्सल वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने कजगाव (ता. भडगाव) येथील रेल्वेस्थानकावरून सर्व प्रकारच्या पार्सलची वाहतूक सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
या निर्णयानुसार कजगाव स्थानकावर आवक व जावक स्वरूपातील विविध प्रकारची पार्सल वाहतूक करता येणार आहे. यामध्ये इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC), जॉइंट पार्सल प्रॉडक्ट-रेल्वे प्रवाशांसह पार्सल सेवा, तसेच पार्सल कार्गो एक्सप्रेस ट्रेनद्वारे होणाऱ्या पार्सल वाहतुकीचाही समावेश आहे.
या सुविधेमुळे कजगाव व परिसरातील व्यापारी, उद्योजक, शेतकरी, व्यावसायिक तसेच ग्राहकांना रेल्वेमार्फत माल पाठविणे व प्राप्त करणे अधिक सुलभ होणार आहे. त्यामुळे स्थानिक व्यापाराला चालना मिळण्याबरोबरच कृषी उत्पादनांच्या वाहतुकीलाही गती मिळण्याची अपेक्षा आहे.
कजगाव परिसर हा कृषी व व्यावसायिकदृष्ट्या महत्त्वाचा असून, येथील शेतकरी व व्यापाऱ्यांना मालाची वाहतूक करण्यासाठी पर्यायी आणि किफायतशीर सुविधा उपलब्ध होणार आहे. रेल्वे पार्सल सेवेमुळे वेळ व वाहतूक खर्चाची बचत होऊन स्थानिक व्यवसायांना त्याचा फायदा होणार आहे.
या निर्णयाचे परिसरातील व्यापारी, उद्योजक, शेतकरी व ग्राहकांकडून स्वागत होत असून, कजगाव रेल्वेस्थानकावरील पार्सल सुविधेचा अधिकाधिक नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन भुसावळ रेल्वे विभागाकडून करण्यात आले आहे.
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
