विशाखा समिती अंतर्गत दामिनी पथकाचे मार्गदर्शन; विद्यार्थिनींना सायबर सुरक्षा व स्वसंरक्षणाचे धडे
शहादा, दि. ३ : शेठ व्ही. के. शाह विद्यामंदिर, शहादा तसेच के. (सौ.) जी. एफ. पाटील ज्युनिअर कॉलेज, शहादा येथे विशाखा समितीच्या वतीने दामिनी पथक मार्गदर्शन कार्यक्रम २०२६ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. विद्यार्थिनींमध्ये महिला सुरक्षा, सायबर गुन्ह्यांबाबत जागरूकता आणि स्वसंरक्षणाची भावना निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमास विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमासाठी दामिनी पथकाच्या महिला पोलीस हवालदार ज्योती पाटील, महिला पोलीस शिपाई सुनीता गावित आणि महिला पोलीस शिपाई अदिती राजवंशी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होत्या.
महिला पोलीस हवालदार ज्योती पाटील यांनी विद्यार्थिनींना मोबाईलचा योग्य वापर, त्याचा होणारा दुरुपयोग, सोशल मीडियाचा सुरक्षित वापर, ऑनलाइन फसवणूक, सायबर गुन्हे आणि त्यापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी घ्यावयाची काळजी याविषयी सविस्तर माहिती दिली. सोशल मीडियावर वैयक्तिक माहिती शेअर करताना सावधगिरी बाळगणे, अनोळखी व्यक्तींशी संपर्क टाळणे, संशयास्पद लिंकवर क्लिक न करणे आणि कोणत्याही प्रकारच्या सायबर छळाची त्वरित पोलिसांकडे तक्रार करण्याचे आवाहन त्यांनी केले.
तसेच शाळा, महाविद्यालय किंवा प्रवासादरम्यान महिलांना व विद्यार्थिनींना येणाऱ्या अडचणी, छेडछाड किंवा त्रासदायक प्रसंगांना धैर्याने कसे सामोरे जावे, मदतीसाठी उपलब्ध असलेल्या पोलीस यंत्रणा, हेल्पलाईन क्रमांक आणि कायदेशीर उपाययोजना याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले. कोणतीही घटना लपवून न ठेवता तात्काळ पालक, शिक्षक किंवा पोलिसांना माहिती देण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.
कार्यक्रमात विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाची प्रात्यक्षिके दाखवून विविध तंत्रांचे प्रशिक्षण देण्यात आले. अचानक उद्भवणाऱ्या धोकादायक परिस्थितीत स्वतःचा बचाव कसा करावा, याची प्रत्यक्ष माहिती देण्यात आली. या प्रात्यक्षिकांमुळे विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास वाढला असून त्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
