महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या संजय गांधी विधवा, अपंग व वृद्धापकाळ योजना या महत्त्वाकांक्षी योजनेचा लाभ अधिकाधिक गरजू व पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी विशेष शोध मोहीम राबविण्यात आली.
या विशेष शोध मोहिमेअंतर्गत जळगाव शहरातील मनपा संचलित संत गाडगेबाबा शहरी बेघर निवारा केंद्र, जळगाव येथे वास्तव्यास असलेल्या लाभार्थ्यांचा शोध घेण्यात आला. यामध्ये एकूण तीन पात्र लाभार्थ्यांची निवड करून त्यांना संजय गांधी वृद्धापकाळ योजनेंतर्गत लाभ मंजूर करण्यात आला.

आज जळगाव शहरातील संजय गांधी योजना अ वर्ग न.पा. क्षेत्र जळगाव कार्यालयात आयोजित कार्यक्रमात संबंधित लाभार्थ्यांना मंजुरी आदेशांचे वितरण करण्यात आले. हे आदेश तहसीलदार श्रीमती रुपाली काळे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना देण्यात आले.
या प्रसंगी श्री नितीन पाटील, ग्राम महसूल अधिकारी, श्रीमती गायत्री दातार, ग्राम महसूल अधिकारी, उपलेखापाल जितेंद्र नेहेते, तांत्रिक सहाय्यक पुरुषोत्तम लोहार, संत गाडगेबाबा शहरी बेघर निवारा केंद्र जळगाव महानगरपालिकेच्या सौ. गायत्री पाटील, श्री शालिग्राम लहासे, संत गाडगे महाराज शिक्षण, सांस्कृतिक व क्रीडा मंडळ संचलित संत गाडगेबाबा शहरी बेघर निवारा केंद्राचे संचालक श्री प्रशांत गायकवाड तसेच केंद्राचे व्यवस्थापक श्री मनोज कुलकर्णी यांची उपस्थिती होती.
सामाजिकदृष्ट्या दुर्बल, निराधार व ज्येष्ठ नागरिकांना शासनाच्या योजनांचा थेट लाभ मिळावा, यासाठी अशा प्रकारच्या विशेष शोध मोहिमा पुढील काळातही सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. या उपक्रमामुळे गरजू लाभार्थ्यांना आर्थिक आधार मिळून त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे.
