जळगाव – मूळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन ‘चैतन्य २०२६’ अंतर्गत विविध सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धांमुळे विद्यार्थी आणि प्राध्यापकांत आनंद, उल्हास, उत्साह आणि जबरदस्त जोश दिसून आला. सांस्कृतिक उपक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या विविध वेशभूषा स्पर्धेत विद्यार्थ्यांनी पारंपरिक, ऐतिहासिक व सामाजिक आशयांच्या विविध वेशभूषांतून आपली कल्पकता, यात असलेली अभिरुची सादर केली. दक्षिण भारतीय, राजस्थानी, काश्मिरी, महाराष्ट्रीयन, बंगाली, कर्नाटकी साडी लूक, महाराष्ट्रीयन साडी लूक तसेच आदिवासी पारंपरिक वेशभूषा अशा विविध वेशांतून भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवण्यात आले. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कवयित्री बहिणाबाई चौधरी, श्यामची आई, वासुदेव, राजकीय नेता, दाक्षिणात्य अभिनेत्री आदी व्यक्तिमत्त्वांचे पेहेरावाची प्रभावी छाप यानिमित्ताने बघायला मिळाली. या स्पर्धेसाठी ज्येष्ठ प्रा. के. के. वळवी व प्रा. डॉ. जयश्री महाजन यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. प्रमुख अतिथी म्हणून जळगावचे नायब तहसीलदार नवीनचंद्र भावसार उपस्थित होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. सं. ना. भारंबे होते. स्पर्धेचे उद्घाटन अनौपचारिकरित्या करण्यात आले. या वेळी स्नेहसंमेलन प्रमुख प्रा. देवेंद्र इंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती. स्नेहसंमेलनांतर्गत शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच महिला शिक्षक यांच्यामध्ये क्रिकेट स्पर्धा घेण्यात आल्या. महिला क्रिकेट स्पर्धेत चार संघ सहभागी झाले. विज्ञान विद्याशाखेच्या महिला प्राध्यापकांची ‘सायन्स इलेवन’ ही टीम विजेती ठरली, तर मानव्य विद्या शाखेच्या महिला प्राध्यापकांची ‘रणरागिणी स्ट्रायकर’ टीम उपविजेती ठरली. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या क्रिकेट स्पर्धेत सहा संघांनी सहभाग नोंदवला. अंतिम सामना मानव्य विद्याशाखेच्या प्राध्यापकांची ‘इलेवन फायटर’ व कार्यालयीन कर्मचाऱ्यांची ‘धुरंधर फायटर’ या संघात रंगतदार झाला. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी पुढील प्रमाणे पारितोषिके प्राप्त केली सोलोमध्ये प्रथम क्रमांक राहुल शरद सपकाळे – वासुदेव , द्वितीय क्रमांक प्रणिता शिंपी – महाराष्ट्रीयन पोशाख, तृतीय क्रमाक रुची महावीर जैन – राजस्थानी पोशाख ग्रुपमध्ये प्रथम क्रमांक सुनील बारेला – बिरसा मुंडा, तंट्या भिल्ल , द्वितीय क्रमांक पूर्वा जोशी – राज सोंग, तुतीय क्रमांक सोनाली पावरा – आदीवासी पोशाख सोलोमध्ये एकूण – ३६ विद्यार्थी सहभागी झाले. तर ग्रुप – १३ सहभागी झाले. आज महाविद्यालयात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, महिला शिक्षक यांच्या क्रिकेट स्पर्धा पार पडल्या. या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. सं.ना. भारंबे यांच्या हस्ते या स्पर्धेंचे उद्घाटन झाले. यावेळी स्नेहसंमेलन प्रमुख प्रा. देवेंद्र इंगळे, सर्व विद्याशाखेचे उपप्राचार्य, डॉ. सुरेखा पालवे, प्रा. मनोजकुमार चोपडा, , अधिष्ठाता प्रा. भूपेंद्र केसुर, प्रा. भूषण कवीमंडन, डॉ. अब्दुलकादिर आरसीवाला, एकलव्य क्रीडा संचालक डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर हे उपस्थित होते. या सर्व स्पर्धांच्या यशस्वी आयोजनासाठी समिती प्रमुख व त्यांच्या समितीतील सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. स्नेहसंमेलनामुळे महाविद्यालयीन जीवनात सांस्कृतिक व क्रीडात्मक चैतन्य निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले.
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
