जळगाव : के.सी.ई. सोसायटीच्या मूळजी जेठा महाविद्यालयात (स्वायत्त) ‘चैतन्य–२०२६’ या वार्षिक स्नेहसंमेलनाचा शुभारंभ ध्वजारोहण व मुख्य रंगमंचाच्या उद्घाटनाने मोठ्या उत्साहात झाला. सळसळत्या तरुणाईचा जल्लोष, उत्साह, आनंद ओसंडून वाहताना दिसून आला. संपूर्ण महाविद्यालय परिसर चैतन्यमय वातावरणाने भारून गेला. प्रारंभी मागील वर्षीचे स्नेहसंमेलनप्रमुख प्रा. डॉ. भूपेंद्र केसुर यांनी या वर्षीचे स्नेहसंमेलनप्रमुख प्रा. देवेंद्र इंगळे यांच्याकडे औपचारिकरीत्या सूत्रे सुपूर्द केली. त्यानंतर कार्यक्रमाच्या मुख्य उद्घाटक व के.सी.ई. सोसायटीच्या शैक्षणिक संचालक डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या हस्ते के.सी.ई. सोसायटीचे ध्वजारोहण करण्यात आले. ‘महाविद्यालयाचा ध्वज’ प्राचार्य डॉ. सं. ना. भारंबे यांच्या हस्ते फडकविण्यात आला, तर ‘चैतन्य–२०२६’ चा ‘ध्वज’ स्नेहसंमेलन प्रमुख प्रा. देवेंद्र इंगळे यांच्या हस्ते फडकविण्यात आला. २०२५-२६ या शैक्षणिक वर्षातील महाविद्यालयातून ‘सर्वोत्कृष्ट विद्यार्थी’ म्हणून टी.वाय.बी.ए. ची रसिका मुकुंद ढेपे, तसेच प्रिन्सिपल्स रोल ऑफ ऑनर म्हणून विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखेतून एस.वाय.बी.एस्सीची कुमुदिनी देवनारायण झा, तर वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेतून टी.वाय.बी.ए. चा विद्यार्थी राहुल प्रवीण महाजन या विद्यार्थ्यांच्या नावाची घोषणा करून मान्यवरांच्या हस्ते त्यांचे अभिनंदन व सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्राचार्य डॉ. सं. ना. भारंबे यांनी मनोगतात सांगितले की, यंदा ध्वजारोहणाने स्नेहसंमेलनाचे उद्घाटन करण्याची नवीन परंपरा सुरू करण्यात आली आहे. या दोन दिवसीय स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांसाठी विविध नावीन्यपूर्ण उपक्रमांची मेजवानी असून, विद्यार्थ्यांनी यात मनमुराद आनंद घ्यावा. हे दिवस आनंद, उत्साह व चैतन्यमय वातावरणात साजरे करावेत. नंतर डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या हस्ते मुख्य रंगमंचाचे उद्घाटन करण्यात आले. याच वेळी विविध छंद व ललित कला प्रदर्शन, पोस्टर प्रदर्शन (१८९ विद्यार्थी), फूड फेस्टिव्हल (२७ स्टॉल) यांचे उद्घाटन झाले. काव्यवाचन, कथाकथन, उत्स्फूर्त भाषण, ‘गंमत-जंमत कवितेतून’ (५३ विद्यार्थी), हास्यप्रधान खेळ (१०० विद्यार्थी), रक्तदान शिबिर (२५ सहभागी), ‘मूल्जियन गायक–१’ (११ विद्यार्थी), अंताक्षरी (१८ विद्यार्थी), खान्देश वैभव (गाणी व नृत्याविष्कार – ( ७० विद्यार्थी), एकांकिका, प्रश्नमंजुषा तसेच एकल, युगल व समूह नृत्य (९० विद्यार्थी) या विविध कार्यक्रमांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमास महाविद्यालयाच्या विविध विद्याशाखेचे उपप्राचार्य डॉ. सुरेखा पालवे, डॉ. मनोजकुमार चोपडा व अधिष्ठाता डॉ. भूपेंद्र केसुर, डॉ. भूषण कविमंडन डॉ. अब्दुलकादिर आरसीवाला, डॉ. देवानंद सोनार, आयक्यूएसी समन्वयक डॉ. केतन नारखेडे, परीक्षा नियंत्रक डॉ. लीना ढाके, कुलसचिव डॉ. जगदीप बोरसे विविध स्पर्धांचे परीक्षक इ. मान्यवर उपस्थित होते. खान्देश वैभव (गाणी व नृत्याविष्कार) कार्यक्रम प्रसंगी मूल्जियन, खान्देशातील सुप्रसिद्ध गायक “बबल्या इकस केसावर फुगे” फेम अण्णासाहेब सुरवाडे यांनी त्यांची सुप्रसिद्ध गाणे गाऊन उपस्थित विद्यार्थ्यांचे मने जिंकली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व समिती प्रमुख व सर्व सदस्य , विविध विषयांचे विभाग प्रमुख तसेच प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी स्वयंसेवक यांनी परिश्रम घेतले. या वेळी महाविद्यालयात मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
