नवापूर[हेमंत विक्रम पाटील]
द्यार्थ्यांनो मोबाईलपासून दूर राहा, मैदानाशी नातं जोडा” — गटशिक्षणाधिकारी रमेश देसले यांच्या विद्यार्थ्यांना मौलिक संदेश
येथील श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात क्रीडा महोत्सव २०२५–२६ ला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन नवापूर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी रमेश आर. देसले यांच्या हस्ते क्रीडा साहित्य व मैदानाचे पूजन करून करण्यात आले.यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका कमल कोकणी, उपमुख्याध्यापक ए. एन. सोनवणे, पर्यवेक्षक हरीश पाटील, पर्यवेक्षक जी. डी. सूर्यवंशी, पालक प्रतिनिधी सरला साळुंखे तसेच शिक्षकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते. उद्घाटनानंतर गटशिक्षणाधिकारी रमेश देसले यांनी फलंदाजी तर पर्यवेक्षक हरीश पाटील यांनी गोलंदाजी करून क्रीडा महोत्सवाची औपचारिक सुरुवात केली.यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना रमेश देसले यांनी विद्यार्थ्यांना मोबाईल व इंटरनेटच्या अति वापरापासून दूर राहण्याचा सल्ला दिला. इतर देशांमध्ये १६ वर्षांपर्यंत मुलांना मोबाईल व इंटरनेट वापरण्यास मनाई करणारे कायदे आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले. दहावीपर्यंत विद्यार्थ्यांनी अभ्यास व खेळावरच भर द्यावा, असा मौलिक सल्ला त्यांनी दिला.

खेळ हा जीवनातील आनंदाचा आणि आरोग्याचा मूलमंत्र असून, दररोज मैदानावर उतरून घाम गाळला पाहिजे. अभ्यासाबरोबरच खेळालाही तेवढेच महत्त्व दिले तरच विद्यार्थी तंदुरुस्त व सक्षम बनतो, असे त्यांनी सांगून क्रीडा महोत्सवासाठी शुभेच्छा दिल्या.या क्रीडा महोत्सवात इयत्ता पाचवी ते बारावीच्या मुला-मुलींनी आपापले संघ सादर करत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. स्पर्धा पाहण्यासाठी मैदान प्रेक्षकांनी खचाखच भरले होते. विजेत्या संघांना संबंधित वर्गांच्या वर्गशिक्षकांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.मैदानावर विविध रंगीबेरंगी क्रीडा ध्वज लावण्यात आल्याने संपूर्ण परिसर क्रीडामय वातावरणाने भारावून गेला आहे. संगीतमय म्युझिक, क्रिकेट सामन्यांवरील समालोचन (कॉमेंट्री) यामुळे मैदान क्रिकेटमय झाले आहे अटीतटीच्या सामन्यांत विजय-पराजयाचे रोमांचक क्षण पाहायला मिळत असून, या स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांचा उत्साह अधिकच वाढला आहे.या क्रीडा स्पर्धांच्या यशस्वी आयोजनासाठी क्रीडा शिक्षक मंगल पाटील व किरण चौधरी यांनी विशेष परिश्रम घेतले असून, त्यांना सर्व शिक्षकांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत पाटील यांनी केले.
