नंदुरबार एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पातर्फे आयोजित प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा क्रीडा संकुल येथे उत्साहात पार पडले. तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत नंदुरबार, शहादा आणि नवापूर या तीन तालुक्यांतील तब्बल १ हजार ४६२ खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे.
उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नम्र गोयल होते. प्रकल्प अधिकारी डॉ. चंद्रकांत पवार, तालुका क्रीडाधिकारी महेश पाटील, प्रमुख पाहुणे अनिल वसावे, दिलीप गावित आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. पवार म्हणाले की, प्रकल्पातील आदिवासी भागातील खेळाडूंमध्ये प्रचंड क्षमता असून योग्य मार्गदर्शन मिळाल्यास हे खेळाडू राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर राज्याचे व देशाचे नाव उज्वल करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी ३१ अनुदानित आणि ३२ शासकीय
आश्रमशाळांमधील विद्यार्थी सहभागी झाले. प्रकल्पातील सर्व खेळाडूंना ट्रॅक सूट, बूट, टी-शर्ट, पॅन्ट, कॅप यांचे वाटप करण्यात आले.
स्पर्धेत उत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची पुढील तालुकास्तरीय आणि विभागीय निवड स्पर्धेसाठी निवड करण्यात येणार आहे. नंदुरबार, शहादा व नवापूर तालुक्यातील विजेत्या खेळाडूंची निवड प्रक्रिया पार पडली आहे.

या निवड प्रक्रियेत लेखाधिकारी सुंदरसिंग पावरा, सहायक प्रकल्प अधिकारी नंदकुमार साबळे, कौशल्य पाडवी, किरण मोरे, योगेश बागल, आदिवासी विकास निरीक्षक सुधीर गावित, विस्तार अधिकारी व्ही. व्ही. सोनार, डी.एच. माळी, निर्मल माळी, पी.एम. वसावे, डी.एन. सोनुने, रुपाली गोसावी, रविंद्र निकम तसेच मुख्याध्यापक, क्रीडा शिक्षक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डी.एन. सोनुने यांनी केले. प्रस्ताविक प्रकल्पाधिकारी डॉ. चंद्रकांत पवार यांनी मांडला तर आभार सहायक प्रकल्प अधिकारी नंदकुमार साबळे यांनी मानले.
या क्रीडा स्पर्धेमुळे आदिवासी विद्यार्थ्यांमधील क्रीडा संस्कार, शारीरिक क्षमता आणि नेतृत्वगुण वृद्धिंगत होण्यास मदत होणार असून जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्राला नवचैतन्य मिळाले आहे.
