

बदरखे, ता. पाचोरा (जि. जळगाव) : पेमा महाराजांच्या कृपाशिर्वादाने बदरखे ग्रामस्थांच्या वतीने ३ व ४ डिसेंबर २०२५ रोजी वार्षिक यात्रेचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले आहे. यात्रेनिमित्त धार्मिक विधी, नवसपूर्ती कार्यक्रम तसेच खेळ व सांस्कृतिक उपक्रमांची विविधता अनुभवायला मिळणार आहे.
यात्रेचा मुख्य आकर्षण असलेली भव्य कुस्ती स्पर्धा दिनांक ४ डिसेंबर २०२५ रोजी भरणार आहे. जिल्ह्यातील तसेच बाहेरील नामांकित मल्ल या स्पर्धेत सहभागी होणार असून विजेत्यांसाठी आकर्षक बक्षिसांची व्यवस्था करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील पारंपारिक कुस्ती संस्कृती जपण्यासाठी गावातील समाज मंडळे, युवक आणि ग्रामस्थांकडून विशेष तयारी करण्यात आली आहे.
मंदिर परिसरात यात्रेनिमित्त नवसपूर्ती विधी, पूजा-अर्चा, भजने आणि भक्तीमय कीर्तन यांचे आयोजन करण्यात आले आहे. दोन्ही दिवशी भाविकांची मोठी गर्दी अपेक्षित असून यात्रास्थळी स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची सोय, प्रकाश व्यवस्था, पोलिस मदत आणि वाहतूक नियंत्रणासाठी ग्रामपंचायत व स्वयंसेवक तैनात असतील.
यात्रेच्या यशासाठी ग्रामस्थ, समिती सदस्य आणि भक्तगणांनी सर्व तयारी पूर्ण केली असून भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमांना उत्साह व गौरव द्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
