मध्य रेल्वेने मनमाड–इंदूर नवीन रेल्वे मार्ग (309.43 किमी) प्रकल्पात आणखी एक महत्त्वाचे पाऊल टाकत हवाई भू-भौतिकीय सर्वेक्षणासाठी ई-टेंडर जाहीर केले आहे. या सर्वेक्षणामध्ये चुंबकीय इमेजिंग व व्हिडिओ रेकॉर्डिंगद्वारे जमिनीची रचना सखोल तपासली जाणार आहे, ज्यामुळे पुढील बांधकाम प्रक्रियेला गती मिळण्याची अपेक्षा आहे.
निविदा क्रमांक DYCE/CON/BSL/09/2025 दिनांक 21 नोव्हेंबर 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आली असून याचे अंदाजित मूल्य ₹77 लाखांहून अधिक आहे. तर बोली सुरक्षितता रक्कम ₹15.43 लाख निश्चित करण्यात आली आहे. कार्यकाळ सुमारे सहा महिने ठेवण्यात आला आहे. निविदा दस्तावेज रेल्वेच्या अधिकृत www.ireps.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
बोली सादर करण्याची शेवटची तारीख 03 डिसेंबर 2025 सकाळी 11 वाजेपर्यंत असून त्याच दिवशी ऑनलाइन बोली उघडली जाईल.
ही माहिती मनमाड–इंदूर रेल्वे संघर्ष समितीचे मनोज मराठे यांनी दिली. त्यांनी सांगितले की मनमाड ते इंदूरदरम्यान जेवढे जमीन अधिग्रहण करायचे आहे, त्या संदर्भात या 77 लाखांच्या टेंडरअंतर्गत काम करणारी कंपनी जिओ-टेकच्या माध्यमातून जमिनीची योग्य मोजणी करेल. यासाठी ट्रॅक्टर व JCB च्या सहाय्याने जमिनीची खोदकाम तपासणी, लांबी-रुंदीची मोजणी तसेच भू-संरचना परीक्षण केले जाईल.
जमीन अधिग्रहणात कुठलीही चूक होऊ नये म्हणून मागितलेली जमीन आणि प्रत्यक्ष भूभागाचा जिओ-टेक डेटा जुळणे आवश्यक आहे. यासाठी ड्रोनच्या सहाय्याने सर्वेक्षण होईल, तर जमिनीवर ट्रॅक्टर आणि JCB चा वापर केला जाईल. त्यामुळे प्रत्यक्ष भूमीस्तरावरही मनमाड–इंदूर प्रकल्पाचे काम आता सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले. ही अत्यंत आनंदाची आणि समाधानकारक बातमी आहे.
संघर्ष समितीने सांगितले की बराच काळ प्रलंबित असलेले हे महत्त्वाचे सर्वेक्षणाचे टेंडर जाहीर होणे हा प्रकल्पासाठी अत्यंत सकारात्मक संकेत आहे. त्यांनी यास “जनतेच्या संघर्षाचा विजय” असे संबोधत हर्ष व्यक्त केला.
समितीचे म्हणणे आहे की मनमाड–इंदूर रेल्वे मार्ग मालवाहतूक व प्रवासी वाहतूक यांना गती देईल तसेच पूर्व व पश्चिम भारतातील संपर्क अधिक बळकट करेल. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर व्यापार, पर्यटन आणि औद्योगिक विकासालाही नवी चालना मिळेल.
समितीने केंद्र सरकार व मध्य रेल्वे अधिकाऱ्यांचे आभार मानत पुढील प्रक्रियादेखील लवकर पूर्ण व्हाव्यात, ज्यामुळे या बहुप्रतिक्षित रेल्वेमार्गाचे स्वप्न लवकर सत्यात उतरेल, अशी आशा व्यक्त केली.
